आधी पुनर्वसन करण्याची मागणी
ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने १९९७ साली वनक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तोडण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. त्यानंतर आता वनविभागाला पावसाळ्याच्या तोंडावर कारवाई करण्याचे शहाणपण आले असून इंदिरा नगर, हनुमान नगर परिसरात कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र आधी पुनर्वसन करा आणि नंतरच कारवाई करा, अशी मागणी हज समितीचे सदस्य बबलू दादुभाई शेख यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सध्या वन विभागाचे कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह कारवाईसाठी रस्त्यावर उतरले असून हनुमाननगर ते कामगार रुग्णालय नाका आणि जुनागाव ते रामनगर परिसरात वाणिज्य वापराचे गाळे बंद करण्यासाठी नागरिकांवर जबरदस्ती करत असल्याचा आरोप बबलू शेख यांनी केला आहे. २७ वर्षांनी आता वनविभाग अचानक कारवाई करत असल्याने रहिवासी आणि गाळेधारक हतबल झाले आहेत. शिवाय लवकरच पावसाळाही सुरू होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बेरोजगार होऊन त्यांची उपासमार होण्याची भीती श्री.शेख यांनी व्यक्त केली आहे.
वन विभागाने ही कारवाई थांबवावी, किंबहुना आधी बाधितांचे पुनर्वसन करावे आणि नंतरच कारवाई करावी, असे साकडे श्री.शेख यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घातले आहे.
दरम्यान या कारवाईमुळे येथील रहिवासी आणि व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही कारवाई तत्काळ थांबवण्याची मागणी बबलू शेख यांनी केली आहे.