नेवाळी ग्रामपंचायतीची आक्रमक भूमिका
अंबरनाथ : रस्त्यावर कचरा फेकाल तर शासकीय दाखल्यांना मुकाल, असा इशाराच येथील नेवाळी ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून कचऱ्याला आग लागल्यास रस्त्यावर धुराचे साम्राज्य पसरते.
ठाणे जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या महापालिका आणि नगरपालिकांच्या वेशीवर मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत आहे. शहरांची क्षमता संपल्याने बांधकाम व्यवसायिक आणि नोकरदार वर्गाने शहराला खेटून असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आपला मोर्चा वळवला. त्यामुळे अचानक या ग्रामपंचायती विस्तारल्या. शहरांच्या धर्तीवर येथे लोकसंख्या स्थलांतरित झाली. मात्र ग्रामपंचायती प्रशासनाचा आवाका लहान असल्याने येथे प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्यात अडचणी येऊ लागल्या.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वेशीवर आणि अंबरनाथ तालुक्यात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींची हीच अवस्था आहे. त्यात अंबरनाथ काटई रस्त्यावर नेवाळी, खोणी अशा अनेक ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणावर वाढल्या. राज्यमार्ग जात असल्याने असंख्य दुकाने, चाळी या ठिकाणी उभ्या राहिल्या. मात्र या चाळींमधून निघणारे सांडपाणी, कचरा याचे व्यवस्थापन झाले नाही. आज मुंबई तसेच ठाण्याहून काटई नेवाळी रस्त्याने प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूंना कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात. या ढिगाऱ्यांना अनेकदा आग लावली जाते. त्यातून धूर बाहेर पडत असताना रस्त्यावरील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. धुरामुळे शेजारच्या रहिवाशांचे आरोग्यही धोक्यात येते. काही दिवसांपूर्वी स्थानिक नेवाळी ग्रामपंचायतीने या कचऱ्याला शिस्त लावण्यासाठी येथे फलक लावले. नागरिकांना येथे कचरा न टाकण्याचे आवाहन केले. कचरा घंटागाडीतच द्यावा असेही आवाहन स्थानिक ग्रामस्थांना करण्यात आले. मात्र त्यानंतरही काही ग्रामस्थ रस्त्यावर त्याच ठिकाणी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे आता नेवाळी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेत कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहे. नेवाळी ग्रामपंचायतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना इशारा दिला असून येथे कचरा टाकणाऱ्याला शासकीय दाखल्यापासून वंचित राहावे लागेल असे ग्रामपंचायती प्रशासनाने सांगितले आहे. येथे कचरा टाकल्यास दंड आकारला जातो आहे. त्या दंडाची रक्कम भरल्यानंतरच आपल्याला शासकीय दाखला जारी होईल, असेही ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे आता या आवाहनाला स्थानिक रहिवासी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.