कशेळीतील कचरा हस्तांतरण केंद्राला हायसे
ठाणे: शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या हस्तांतरण केंद्राला कोलशेत बाळकूम येथे होणारा विरोध अखेर मावळला आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शहराच्या भल्यासाठी विरोधाची भूमिका मवाळ केल्याने कचरा हस्तांतरण केंद्राचा प्रश्न सुटला असून महापालिका अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कशेळी येथील खाडी किनारी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. त्याविरोधात स्थानिक गावकऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध केला होता. घनकचरा विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी स्थानिकांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे आमदार संजय केळकर, संजय वाघुले यांनी कचरा हस्तांतरण केंद्राच्या जागेवर जाऊन पाहणी केली. त्या भागात कचरा टाकून तत्काळ उचलण्याच्या सूचना केल्या तसेच कोस्टल मार्गांवर देखिल तात्पुरता कचरा टाकण्याबाबत भाजपा आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांत एकमत झाले, त्यामुळे या भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात कचरा टाकून लगेच हा कचरा उचलण्याची हमी महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शहरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे विकेंद्रिकरण केल्याने कचरा हस्तांतरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होणार नाही, असा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
ठाणे शहरात दर दिवशी किमान एक हजार मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. लहान गाड्यांमधून हा कचरा सी.पी. तलाव येथिल केंद्रावर टाकला जात होता. या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सुरु झाला होता. त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतर महापालिकेने टिकूजीनी वाडी येथिल मुल्ला बाग परिसरातील महापालिकेच्या परिवहन आगार येथे देखिल केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला होता, त्याला देखिल विरोध झाला होता.
याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय भोईर आणि संजय वाघुले यांनी तोडगा काढल्याने कचरा हस्तांतरण केंद्राचा प्रश्न सुटला आहे.
या भागातील नागरिकांना कचऱ्याचा त्रास होणार नाही, याची काळजी महापालिका घेईल, असे आश्वासन देखिल त्यांनी दिले. येथे टाकलेला कचरा आतकोली येथिल कचरा प्रक्रिया केंद्रावर तत्काळ पाठवला जाईल, असे देखिल श्री.जोशी यांनी सांगितले.