मोबदल्यासाठी शेतकरी उतरले समृद्धी महामार्गावर

शहापूर: तालुक्यातील अंदाड या गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या आठ वर्षांपासून मोबदल्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग सुमारे एक तास रोखून धरला. ‘परत करा.. परत करा.. आमच्या जमिनी परत करा’, अशा गगनभेदी घोषणांनी समृद्धीचा परिसर दणाणून गेला. दरम्यान लवकरात लवकर आमच्या हक्काचा मोबदला द्यावा अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

मुंबई-नागपूर हा बहुउद्देशीय समृद्धी महामार्ग सरकारने बांधला असून इगतपुरी ते भिवंडी या अखेरच्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले आहे. या महामार्गासाठी शहापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या कसत्या जमिनी सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या. मात्र अजूनही अनेकांना योग्य मोबदला मिळू शकला नाही. २०१७ मध्ये शहापुरातील अंदाड येथील विधवा महिला आणि मजूर शेतकरी अशा एकूण सात शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मोबदला मिळेल अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना गेली आठ वर्षे पाठपुरावा करून फुटकी कवडीही मिळाली नाही. शासन दरबारी खेट्या मारूनही निराशा आल्याने मानसिक धक्क्यात यशवंत पंडित व यशोदा पंडित या दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचा निषेध करण्यासाठी समृद्धी महामार्गावर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. या वेळकाढू धोरणाचा तीव्र निषेध करीत अंदाडच्या शेतकऱ्यांनी कोळकवाडी येथील टोल नाक्याजवळ समृद्धी महामार्ग तब्बल एक तास रोखला होता.

शहापूर तालुक्यातील मजूर शेतकरी गुलाब भोईर, जयराम गडगे, गणेश पंडित व विधवा महिला बेबी पवार, सविता भडांगे, पूनम मोगरे, नीरा भेरे अशा सात जणांची किमान दहा एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली. आज संतप्त शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखत जमिनीचा तत्काळ मोबदला द्या,अशी जोरदार मागणी केली. दरम्यान एक आठवड्यात मोबदला न मिळाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेश गडगे यांनी दिला आहे.