सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून उमनपाचा राज्यात दबदबा

उल्हासनगर : महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अतंर्गत सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून प्रथम क्रमांकावर उल्हासनगर महानगरपालिकेचे नाव घोषीत करण्यात आले. महाराष्ट्रातील एकूण २९ महापालिकेमधून सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून ८६.२९ टक्के गुणासह उल्हासनगर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकवण्यात आला आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उप- आयुक्त विशाखा मोटघरे, विजय खेडकर, दिपाली चौगुले आनंत जवादवार, सहायक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे, सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सहाय्यक आयुक्त मयुरी कदम, सुनील लोंढे, मुख्य लेखाअधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख आदी उपस्थित होते.

उल्हासनगर पालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी नियुक्ती झाल्यावर, आयुक्त पदाचा पदभार तात्कालीन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर शासनाकडून पुणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली होती.विशेष म्हणजे १९९६ साली महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आयुक्त पदावर विराजमान होणाऱ्या मनिषा आव्हाळे ह्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.