मुंबई : बदलापूरस्थित शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी स्पष्ट आदेश देऊनही पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात न आल्यावरून उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. तसेच, पुढील तपासासाठी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) प्रकरणाची कागदपत्रे तातडीने वर्ग करण्याचे आदेश दिले.
प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक (नवी मुंबई) प्रशांत वागूळ यांना अवमानप्रकरणी दोषी धरण्याचा इशारा दिल्यानंतर सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे न्यायालयात उपस्थित झाले. तसेच, त्यांनी प्रकरणाची कागदपत्रे एसआयटीला सुपूर्द करण्याची हमी न्यायालयाला दिली. त्यानंतर, न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. तत्पूर्वी, पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवलेला नसल्याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. तसेच, आदेशाचे पालन झाले नाही हे धक्कादायक असून हे आमच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचेही न्यायालयाने सुनावले. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन सरकर कसे करत नाही ? असा प्रश्न करताना प्रकरणाची कागदपत्रे आजच एसआयटीकडे सुपूर्द केली नाहीत, तर फौजदारी अवमान कारवाई सुरू करू, असा इशाराही न्यायालयाने दिला.
शिंदे याच्या कोठडी मृत्यू प्रकरणाचा तपास आणि त्या अनुषंगाने प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाचे अद्याप पालन करण्यात आलेले नाही. कागदपत्रे वर्ग करण्यात कसली भीती ? असा प्रश्न करताना हे अनाकलनीय असल्याची टीका न्यायालयाने केली.
शिंदे यांच्या पालकांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ७ एप्रिल रोजी निर्णय देताना, या प्रकरणी सकृतदर्शनी गुन्हा घडल्याचे उघड होते. त्यामुळे, पोलिसांनी शिंदे याच्या कोठडी मृत्युप्रकरणी गुन्हा नोंदवणे बंधनकारक आहे, असा निकाल न्यायालयाने दिला होता. तसेच, प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे सहआयुक्त लख्मी गौतम यांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी, शिंदे याच्या कोठडी मृत्यूची चौकशी करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दोन दिवसांत प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे एसआयटीकडे सोपवण्याचे आदेशही दिले होते.
प्रकरण काय आहे?
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या शिंदेला २३ सप्टेंबर २०२४ रोजी तळोजा तुरुंगातून कल्याणला नेत असताना पोलीस चकमकीत ठार झाला होता. शिंदे याने त्यांच्यावर गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो मारला गेला, असा दावा पोलिसांचा आहे. तथापि, आपल्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा दावा करून प्रकरणाची स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत चौकशीचे आदेश देण्याच्या मागणीसाठी शिंदे यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.