भररस्त्यात पोलीस हवालदारावर उगारली तलवार

झडप घालून तडीपार गुंडाला अटक

ठाणे: विविध गंभीर गुन्ह्यासह एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या तडीपार गुंडाने कर्तव्यावरील पोलीस हवालदारांना तलवारीचा धाक दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

हा प्रकार भिवंडी शहरातील अन्सार नगर मैदानाच्या बाजूला घडला आहे. याप्रकरणी गुंडाच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सफरअली उर्फ गफू मोहम्मद युनूस शेख (४२ रा. गैबीनगर, भिवंडी) असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपार सफरअली उर्फ गफू हा पोलीस रेकॉडवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ च्या निर्देशानुसार ६ मार्च २०२५ पासून एका वर्षासाठी ठाणे, पालघर या महसूली जिल्ह्यांच्या क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, हद्दपार असतानाही तो भिवंडीत कारसह अवैध शस्त्रासह येथील २४ एप्रिल रोजी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास एका कारमधून जाताना सशस्त्र आढळून आला होता. पोलिसांना पाहताच तो पळून जात असताना पोलीस हवालदार लक्ष्मण सहारे यांनी झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गुंड सफरअलीने कारमधून उतरून तलवार पोलिसांच्या दिशेने भिरकावली. कोणी पकडण्यासाठी आल्यास त्यास तलवारीने मारून टाकेन, अशी धमकी देत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही या तडीपार गुंडाला पोलिसांनी झडप घालून अटक केली.

दरम्यान, पोलीस हवालदार लक्ष्मण सहारे यांच्या तक्रारीवरून गुंड सफरअलीच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यास अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मारुती कंपनीची कार क्र.एम एच ०२/बीएम ५३२५ आणि एक तलवार, अँड्रॉइड मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर केलं असता २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या आरोपीवर १२ गुन्हे दाखल असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे करीत आहेत.