फक्त ४२ दिवसांत सिडकोने उभारले बहुमजली वाहनतळ

* खारकोपरमध्ये मिशन-४५ अंतर्गत झटपट पण दर्जेदार बांधकाम
* जगप्रसिद्ध प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर

नवी मुंबई: सिडकोतर्फे मिशन ४५ अंतर्गत नवी मुंबईतील खारकोपर येथील सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे (मल्टि-लेव्हल कार पार्किंगचे) बांधकाम विक्रमी ४२ दिवसांत पूर्ण करण्यात आले.

सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६७ हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये गृहनिर्माण योजनेतील इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू असून यातील सदनिका टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मिशन-४५ अंतर्गत सदर महागृहनिर्माण योजनेच्या पॅकेज-४ अंतर्गत खारकोपर येथील भूखंड क्र. ३ वर बहुमजली वाहनतळ उभारण्यात आले आहे. वाहनतळाचे काम ४ मार्च २०२५ रोजी सुरू होऊन १७ एप्रिल २०२५ रोजी पूर्ण झाले. नियोजित वेळापत्रकाच्या तीन दिवस आधी म्हणजे केवळ ४२ दिवसांत या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अशाप्रकारच्या पारंपरिक बांधकामाकरिता लागणारा सहा महिन्यांचा कालावधी विचारात घेता साडे चार महिन्यांच्या कालावधीची बचत झाली आहे. प्रगत व जगप्रसिद्ध प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत अल्प कालावधीमध्ये उभारण्यात आली आहे. या बांधकामात एकूण २,२१२ प्रीकास्ट घटकांचा वापर करण्यात आला होता. प्लिंथ टू टेरेस आरसीसी प्रकारातील हे बांधकाम आहे. तळ + ६ मजले अशी या इमारतीची रचना असून ६ मजले हे वाहनतळ म्हणून व तळ मजला हा समाज केंद्राकरिता आहे. वाहनतळाचे बांधीव क्षेत्र १.४३ लाख चौ. फुट असून ३६५ चार चाकींकरिता वाहनतळ नियोजित आहे. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे व जागेच्या अभावामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, अशा प्रकारच्या बहुमजली वाहनतळामुळे सिडकोच्या गृहसंकुलांतील रहिवशांना आपल्या वाहनांचे पार्किंग करणे सुलभ होणार आहे.

सिडकोचे हे यश साजरे करण्यासाठी शुक्रवार, २५ एप्रिल २०२५ रोजी विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, शीला करुणाकरन, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), सिडको, प्रभाकर फुलारी, अतिरिक्त मुख्य अभियंता, सिडको यांसह सिडकोतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.