डोंबिवलीवर शोककळा!

पहलगाम हल्ल्यात मोने, लेले, जोशी यांचा मृत्यू; जिल्ह्यातील ३७ पर्यटक सुरक्षित; आज डोंबिवली बंदची हाक

ठाणे: पहलगामच्या बैसरन व्हॅलीत मंगळवारी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन २७ पर्यटकांना ठार मारले होते. यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांसह महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघा मित्रांचा मृत्यू झाल्याने अवघ्या डोंबिवलीवर शोककळा पसरली आहे. उद्या डोंबिवली बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील ३७ पर्यटक पहलगाम येथे सुरक्षित असून त्यांना विशेष विमानाने आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पनवेलमधील दिलीप देसले यांचा दहशतवाद्याच्या गोळीबारात जागीच मृत्यू झाला. तर पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे यांचा काल रात्री उशीरा उपचारावेळी मृत्यू झाला.

जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे कुटुंबासह पर्यटनासाठी गेलेले डोंबिवलीतील तीन रहिवासी दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी हल्ल्यात ठार झालेल्या मृतांची नावे आहेत.

संजय लेले यांच्या हर्षल नावाच्या मुलाच्या हाताला बोटी चाटून गेली आहे. त्यामुळे तोही जखमी झाला आहे. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिम भागात राहतात. मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवलीत राहत असलेले हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील गटाने पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते. तेथे त्यांचा बंगला होता. एकत्र कुटुंब पध्दतीने हे कुटुंब यापूर्वी त्या भागात लेले वाड्यात राहत होते. संजय लेले हे स. वा. जोशी शाळेचे विद्यार्थी होते. मनमिळावू स्वभावाचे संजय लेले नोकरी करत होते, अशी माहिती त्यांचे सहाध्यायी देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी सांगितले. तिन्ही मृतांचे नातेवाईक रात्रीच काश्मीर येथे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी निघाले आहेत. दहशतवादी हल्ल्ल्याचा डोंबिवलीतील विविध संस्था, नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

हेमंत जोशी आपल्या कुटुंबीयांसह यंदाच्या उन्हाळी सुट्टीत काश्मीरला गेले होते. या कुटुंबाने काश्मीरला जाताना विमानात बसल्यानंतर एक सेल्फी घेतला होता. हाच सेल्फी हेमंत जोशी यांचा शेवटचा फोटो ठरला.

अनुष्का मोने (35 वर्षे), ऋचा मोने (18 वर्षे), मोनिका जोशी (45 वर्षे), ध्रुव जोशी (16 वर्षे), कविता लेले (46 वर्षे), हर्षल लेले (20 वर्षे), भुषण अशोक गोळे (39 वर्षे), ज्योती अशोक गोळे (36 वर्षे), आरव भुषण गोळे (8 वर्षे), विनोद विश्वास गोळे (41 वर्षे), माधुरी विनोद गोळे (41 वर्षे), विहान विनोद गोळे (11 वर्षे), स्वाती विश्वास गोळे (36 वर्षे), अतुल प्रकाश सोनवणे (42 वर्षे), प्रियंका अतुल सोनवणे (34 वर्षे), अनन्या अतुल सोनवणे (12 वर्षे), अर्णव अतुल सोनवणे (8 वर्षे), नंदकुमार म्हात्रे (65 वर्षे), निलिमा म्हात्रे (65 वर्षे), निशांक म्हात्रे (31 वर्षे), प्रमदा पाटील (30 वर्षे), सुजन पाटील (63 वर्षे), आशा पाटील (60 वर्षे), नेहा ठाकूर (35 वर्षे), मनोज ठाकूर (39 वर्षे), विहान ठाकुर (07 वर्षे), संजय म्हात्रे (58 वर्षे), स्वाती म्हात्रे (49 वर्षे), नेत्रा भूषण पांगेरकर (37 वर्षे), भूषण इंद्रनाथ पांगेरकर (40 वर्षे), इंद्रायणी इंद्रनाथ पांगेरकर (65 वर्षे), श्लोक भूषण पांगेरकर (12 वर्षे), विहान देवेन ढोलम (05 वर्षे), गौरव सांगळे (37 वर्षे), दिपाली सांगळे (35 वर्षे), स्वाती सांगळे (40 वर्षे), वेद सांगळे (07 वर्षे), शुभ क्षीरसागर (10 वर्षे), मनाली प्रणय ठाकूर (28 वर्षे), प्रणय ठाकूर (29 वर्षे) हे पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षित असून त्यांना विशेष विमानाने आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.