ठाण्यातील नाले झाले टर्फ आणि रस्ते

आमदार संजय केळकर यांनी पाहणी दौऱ्यात उघड पाडले पितळ

ठाणे : रुस्तमजी परिसरातील नाला तुंबल्याने तो जणू रस्ताच झाला असून बाळकुम दादलानी परिसरातील नाल्याची स्थिती तर टर्फसारखी झाली आहे. आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नियमितपणे पाहणी करावी, पूर्वीसारखी नालेसफाई यंदा झाली तर ठाणेकर अधिकारी आणि ठेकेदारांना सोडणार नाहीत, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.

नालेसफाईत दरवर्षी होत असलेल्या हात की सफाईचा अनुभव लक्षात घेत आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील मनोरमा नगर, कोलशेत, बाळकुम, राबोडी, कॅसल मिल, खोपट एसटी डेपो, शहीद गार्डन, रायगड आळी आदी परिसरातील नाल्याची पाहणी केली. यावेळी नाल्यांच्या स्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत कंत्राटदार आणि प्रशासनाला गर्भित इशारा दिला. या पाहणीत त्यांना नाल्यांची दुरवस्था नजरेस पडली. यावेळी त्यांनी ठेकेदारांच्या बनवाबनवीचे दाखलेही दिले. कोणता नाला कुठे थांबतो आणि कुठे जोडला गेला आहे, हे देखील ठेकेदाराला माहिती नसल्याने त्याची माहिती आम्हाला द्यावी लागली. कारण या ठेकेदारांनी नालेसफाई करण्यापूर्वी फिरून त्याची पाहणीच केलेली नाही. केवळ चार भिंतीत बसून बिले तयार करत असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला.

नालेसफाई करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, यांत्रिक सामुग्री आणि कामाचे तास याबाबत ठेकेदार लपवाछपवी करत असतात. अधिकचे काम दाखवून प्रत्यक्षात वरवर सफाई केली जाते, बिले मात्र पूर्ण कामाची काढली जातात. त्यामुळे आम्ही आतापासूनच त्यांच्या कामावर नजर ठेवून आहोत. नालेसफाईसाठी आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात हात की सफाई होऊ नये म्हणून आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी देखील रस्त्यावर उतरून वेळोवेळी पाहणी करावी, गतवर्षीप्रमाणे यात फसवणूक झालेली आढळून आली तर ठाणेकर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीत, असा इशारा श्री.केळकर यांनी दिला.

रुस्तमजी येथील नाल्याला रस्त्याचे स्वरूप आले असून बाळकुम येथील नाल्याला टर्फचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे चुकून तरुण मंडळी तेथे खेळायला जातील, अशी उपहासात्मक टीकाही श्री.केळकर यांनी केली. ‘आम्ही काही महिन्यांपूर्वी आदर्श नाले दत्तक योजना लोकसहभागातून राबवली. त्या नाल्यात ना गाळ, ना कचरा दिसत आहे. शिवाय आच्छादनामुळे परिसराच्या सौंदर्याला कोणतीही बाधा नाही आणि दुर्गंधीपासून देखील सुटका झाली आहे. या योजनेचा आदर्श घेऊन शहरातील नालेसफाईची कामे व्हावीत, अशी अपेक्षा श्री.केळकर यांनी व्यक्त केली.

यावेळी पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांच्याबरोबर माजी नगरासेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, रमाकांत मढवी, सचिन पाटील, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, संजय कदम, सचिन शिनगारे, निलेश पाटील, जितेंद्र मढवी, हेमंत म्हात्रे, महेश कदम, प्रमोद घोलप, विशाल वाघ, विक्रम भोईर आदी उपस्थित होते.