राम रेपाळे शिवसेनेच्या राज्य सचिवपदी

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून ओळख असलेले ठाण्यातील माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्यावर राज्य सचिव पदाची मोठी जबाबदारी शिवसेना शिंदे गटाने सोपवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रेपाळे यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ही बढती देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेत स्थायी समिती सभापती पद भुषवलेले राम रेपाळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राम रेपाळे यांनी नेहमीच शिंदे यांना भक्कम साथ दिली आहे. शिवसेनेचे दोन गट झाले तेव्हाही रेपाळे यांनी शिंदेंच्या रणनितीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या गटात आणण्याची कामगिरी चोख बजावली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशक्य असलेल्या जागा निवडून आणल्या. मागील काही दिवसांपासून शिवसेनेत सुरु असलेल्या इन कमिंगचे मास्टर माईंड श्री. रेपाळे हे आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल उशीरा का होईना घेण्यात आली आहे. राम रेपाळे यांना महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याआधी माजी महापौर संजय मोरे यांनाही शिवसेना सचिवपदी विराजमान करण्यात आले आहे. त्यांच्यावर देशपातळीची तर रेपाळे यांच्यावर महाराष्ट्राच्या संघटनात्मक कार्याची जबाबदारी असणार आहे.