इमारती रिकाम्या करण्यास नागरिकांचा नकार
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ८५ इमारतींपैकी २५ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आल्या असल्या तरी अद्याप ६१ अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही ठिकाणी एकाच इमारतींचे दोन वेळा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून एका ऑडिट रिपोर्टमध्ये इमारत धोकादायक तर दुसऱ्या ऑडिट रिपोर्टमध्ये इमारत अतिधोकादायक दाखवण्यात आल्याने अनेक ठिकाणी इमारती रिकाम्या करताना पालिका प्रशासन आणि रहिवाशांमध्ये वाद निर्माण होत आहेत. तर इमारत रिकाम्या करण्यास देखील रहिवाशांचा विरोध असल्याने या इमारती रिकाम्या करताना पालिका प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण केले जाते. यावर्षीही महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात केली असून महापालिकेच्या रेकॉर्डनुसार ठाण्यात ४,२९६ इमारती आहेत. तर ८५ अतिधोकादायक इमारतींपैकी २५ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास महापालिका प्रशासनाला यश आले असून उर्वरित ६१ इमारती अजूनही महापालिकेला रिकाम्या करता आलेल्या नाहीत. अनेक इमारतींमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचे घोळ असून यामुळे रहिवाशी आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये वारंवार वादाचे खटके उडत आहेत.
एप्रिल महिन्याच्या शेवटी इमारती रिकाम्या करण्याच्या मोहिमेला महापालिकेच्या वतीने सुरुवात केली जाणार आहे. इमारती रिकाम्या करताना महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरु होण्यास केवळ पुढचा मे महिनाच शिल्लक असून एका महिन्यात या इमारती रिकाम्या करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. या इमारतींमध्ये एखादी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील यानिमित्ताने समोर आला आहे.
धोकादायक इमारतींची श्रेणी
* सी-१: या श्रेणीत अतिधोकादायक इमारतीचा प्रकार असून अशी इमारत नोटीस बजावल्यानंतर काही कालावधीनंतर जमिनदोस्त केली जाते.
* सी-२ ए: या श्रेणीमध्ये धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांचे संरचनात्मक परिक्षण केले जाते.
* सी-२ बी: या श्रेणीमध्ये इमारती रिकाम्या न करता दुरुस्त करता येतात.
* सी ३: या श्रेणीत इमारतीची किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते.