दिघा येथील धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करा

* खासदार नरेश म्हस्के यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन
* ठाणे, नवी मुंबई रेल्वे स्थानकांत तत्काळ सुविधा देण्याची मागणी

ठाणे ; ठाणे आणि नवी मुंबई विभागीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांची आज बुधवार, 23 एप्रिल रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील स्थानके आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे महाव्यवस्थापकांनी समस्यांवर तोडगा काढण्याचे तसेच लवकरच स्थानकांचा पाहणी दौरा करणार असल्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक रमाकांत म्हात्रे, शिवराम पाटील, माजी नगरसेवक विजयानंद माने, शहर संघटक नंदा काटे, जयेश जाधव, अजित दुबे (रेल्वे कमिटी सदस्य) आदी उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातील समस्यांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. वर्तकनगर येथील आरक्षण खिडकी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी निर्देश दिले.

नवी मुंबई शहारातील रेल्वे स्थानकांतील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये दिघा, भोलानगर, अनंत नगर रेल्वे खालून गणपती पाडा येथे राहणाऱ्या रहिवाश्यांकरिता जाण्या-येण्याकरिता अंडरपास बनवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दिघा येथे असलेले पाण्याचे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हे धरण हस्तांतरीत झाल्यास दिघा येथील पाणी समस्या दूर होण्यास मदत होईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले.

सर्व रेल्वे स्थानकांमधील शेड पत्रे, पंखे, लाईट, ध्वनिक्षेपक दुरूस्ती करणे तसेच बाहेरील पेव्हर ब्लॉक दुरूस्त करणे; स्थानका बाहेरचा परिसर स्वच्छ करणे; रेल्वे स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कुलर बसविण्यांत यावे; दिघा ते तुर्भे स्थानकाबाहेर बुट पॉलीश धारकांना जागा देणे; काही स्थानकांमध्ये उंचीच्या अनुषंगातून सरकते जिने बसविणे; ऐरोली स्थानकामध्ये आरक्षण खिडकी सुरू करणे; बहुमजली पार्किंग; कोपरखैरणे स्थानकाबाहेरील पार्किंग सुस्थितीत करणे; रात्रीची गस्त वाढविणे; रबाले स्थानक पश्चिमेकडील तिकीट खिडकी रात्री 11 वाजेपर्यंत चालू ठेवणे; सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे थांबलेले  काम लवकर सुरू करणे अशा अनेक प्रलंबित समस्यांसंदर्भात डीआरएम हरेश मिना यांचीशी  चर्चा करून या समस्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व त्यानुसार कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

लवकरच नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांचा पाहणी दौरा डीआरएम यांच्यासमवेत आयोजित करण्यात येणार आहे. सिडको कडील रेल्वे स्टेशनच्या समस्या, नवी मुंबईमधील रेल्वे स्टेशन हस्तांतरित करण्यासंदर्भात सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.