रेल्वे मार्गातील उड्डाणपुलांची कामे वेगात पूर्ण
मुंबई : कर्जतवरून मुंबईला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या रेल्वे मार्गाचे काम ७१ टक्के पूर्ण झाले आहे. वर्षअखेरीस पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमआरव्हीसीने ठेवले आहे. नुकताच, या मार्गातील चौक रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यात आल्या.
मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी, मुंबई आणि कर्जत परस्परांशी जोडण्यासाठी, पनवेलवरून थेट लोकलने कर्जत गाठता यावा यासाठी पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गावरील सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. ठाणे-दिवा दरम्यानचा पारसिक बोगदा सध्या मुंबई महानगरातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा आहे. मात्र, येत्या काही काळात पनवेल-कर्जत दरम्यानचा वावर्ले बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) दिलेल्या माहितीनुसार, सध्या नऊ प्रमुख पुलांपैकी सहा पूर्ण झाले आहेत, तर, ३५ लहान पुलांपैकी ३३ पूर्ण झाले आहेत. एका उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित चार उड्डाणपुलांचे काम प्रगतीपथावर आहे. यासह १६ भुयारी मार्गांपैकी १५ भुयारी मार्ग तयार झाले आहेत. शिवाय, या रेल्वे मार्गात ३,१६४ मीटर लांबीचे नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे आहेत. या तिन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित कामे सुरू आहेत.
पनवेल-कर्जत मार्गावर पाच स्थानकांचा समावेश असणार आहे. त्यात पनवेल, चौक, महापे, चिखले, कर्जत या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांच्या बांधणीचे कंत्राट देण्यात आले आहे. पनवेल स्थानक इमारत, कर्मचारी निवास्थान, ओव्हरहेड वायर साधनांचे आगार व पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू आहे. तसेच फलाट, पादचारीपुलाचे नियोजन सुरू आहे.
भविष्यात पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. तसेच, मुंबईला जोडण्यासाठी आणखी एक मार्ग तयार होईल. त्याचबरोबर पनवेल आणि कर्जत परस्परांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा तयार होईल. त्यामुळे, उपनगरीय प्रवाशांना आणि मालवाहतुकीसाठी फायदा होईल. दुहेरी मार्गामुळे नवी मुंबई, रायगड आणि लगतच्या भागातील प्रवाशांना प्रवासासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) दिली.
महापे-चिखले स्थानकांदरम्यान ७.८ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्यात आला आहे. सध्या या मार्गावर ईयूआर रेकची वाहतूक होत आहे. येथील कामे पूर्ण झाल्यावर कर्जत-चौक स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाची जोडणी सुरू होणार आहे. यासह पुणे एक्स्प्रेस वे येथील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.