सडके बटाटे वापरून समोसे: मोहनेत मनसेने केली पोलखोल

कल्याण: मोहने येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गाळेगाव परिसरातील खोलीमध्ये सडके बटाटे वापरून समोसे तयार करून फेरीवर विक्रीसाठी देणाऱ्या व्यवसायिकाचा पर्दाफाश केला आहे.

कार्यकर्त्यांनी विक्रेत्याला सडके बटाटे वापरून समोसे बनवण्यावरून जाब विचारला. तसेच, त्याच तेलात वारंवार समोसे तळले जात असल्याचा आणि अत्यंत घाणेरड्या वातावरणात व्यवसाय चालवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत, हा समोसे विक्रीचा व्यवसाय एका लहानशा खोलीत सुरू असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी स्वच्छता राखली जात नव्हती आणि खाद्यपदार्थ बनवण्याची प्रक्रिया अतिशय अस्वच्छ वातावरणात सुरू होती, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त, विक्रेत्याकडे अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार आवश्यक असलेले फूड लायसन्स तसेच खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना नसल्याचेही समोर आले आहे.
शाखा अध्यक्ष विनोद पाटील आणि उपविभाग अध्यक्ष हरीश जावळे यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रकाराची पोलखोल केली असून, त्यांनी या सर्व गैरप्रकारांचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे म्हणून सादर केले आहेत. कार्यकर्त्यांनी तात्काळ या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबेल.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांकडूनही या विक्रेत्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे. अन्न आणि औषध प्रशासन आता या प्रकरणी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्न विक्री करणाऱ्या इतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

यावेळी गोविंद परमार, हनी ठाकूर, दयानंद पुजारी, शाम ठाकूर, अजय पवार, निलेश पाटील, आणि इतर मनसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.