सी लिंक प्रॉपर्टीकडून शेकडो सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक

नागरिकांना न्याय मिळवून देणार आ.संजय केळकर

ठाणे : ठाणे-मुंबईतील हक्काच्या घरांची स्वप्ने पाहणाऱ्या शेकडो सर्वसामान्य नागरिकांची सी लिंक प्रॉपर्टी या कंपनीने फसवणूक केली असून या नागरिकांनी आज आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात पोहोचून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. यावेळी श्री.केळकर यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा करून या नागरिकांना न्याय मिळवून d नर असल्याचा विश्वास दिला.

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या “जनसेवकाचा जनसंवाद” या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तक्रारींचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या उपक्रमांतर्गत शेकडो नागरिकांनी आ. केळकर यांची खोपट कार्यालयात भेट घेतली. यावेळी तक्रारीची 62 निवेदने प्राप्त झाली. महापालिका संबंधित, महानगर गॅस संदर्भात, फेरीवाले, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फसवणूक अशा विविध विषयांतील निवेदने आ. केळकर यांना देण्यात आली.

यावेळी खोपट कार्यालयात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, ओंकार चव्हाण, राजेश गाडे, संतोष साळुंखे उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षानी आ. केळकर यांची भेट घेतली.

या जनसंवाद उपक्रमात आ. केळकर यांना पनवेल, मुलुंड, घाटकोपर, दादर, साकीनाका, चेंबूर, बोरिवली, आदी भागातून घरांसाठी फसवणूक झालेले नागरिक भेटण्यासाठी आले होते. या सर्वांची सबसे सस्ता सबसे अच्छा या स्लोगनवर सी लिंक प्रॉपर्टीने घोर फसवणूक केली आहे. सी लिंक प्रॉपर्टीने या नागरिकांशी खोटे करार केले आहेत. लोकांना दिलेले धनादेश बाऊन्स झाले आहेत. याबाबत आ. केळकर यांची या फसवणूकदारांनी घरासाठी गुंतवलेले पैसे परत मिळावे याकरिता भेट घेऊन निवेदन देऊन विनंती केली.

आ. केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ही बाब खूप गंभीर व चीड येणारी आहे. गरीब सामान्य माणूस एक-एक पैसा जोडतो, कर्ज काढतो, दागिने गहाण ठेवतो, त्यांचा कष्टाचा पैसा असतो आणि आपल्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता पैसे गुंतवतो. पण असे विकासक या सामान्य लोकांची फसवणूक करून त्यांचे घराचे स्वप्न तर भंग करतात शिवाय त्यांनी पैसे परत मागितले तर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात. ही बाब आम्ही सहन करणार नाही असे आ. केळकर यांनी सांगून या विषयाबाबत तातडीने पोलीस आयुक्ताशी चर्चा करून अशा फसवणूक करणाऱ्या विकासकांवर तातडीने कठोर कार्यवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

रस्त्यावर गजरे विणणारे, सफाई कामगार, सुरक्षारक्षक, फेरीवाले असे गरीब कष्टकरी नागरिक आहेत. आ. केळकर यांनी या कष्टकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.