उद्योजक पनवेलकर यांच्या घरावर भरदिवसा गोळीबार

दुचाकीवरून आलेले हल्लेखोर फरार

अंबरनाथ: येथील प्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर भरदिवसा हवेत गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने अंबरनाथ हादरले आहे. गोळीबाराची घटना सीसी कॅमेऱ्यात कैद झाली असून गोळीबाराच्या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

आज सोमवारी दुपारच्या सुमारास हा थरार घडला आहे. दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरासमोर हवेत गोळीबार करून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अंबरनाथ पूर्व भागात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर विश्वनाथ पनवेलकर यांचे सीताई सदन आहे. आज सोमवारी दुपारी अडीचच्या दरम्यान पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरुन पळ काढला.

गोळीबाराची ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. हल्लेखोरांनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पाहणी केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस, तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली असून गुन्हे शाखेकडून देखील समांतर पातळीवर तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. दरम्यान हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.