खासदार नरेश म्हस्के यांची ठाकरे गटावर टीका
ठाणे: भावंडांना सुईच्या टोकाइतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन असून त्यांनी इतर भावंडांना कायम सापत्न वागणूक दिली. उद्धव ठाकरेंमुळेच राज यांना शिवसेना सोडावी लागली, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज केली.
ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार म्हस्के यांनी उबाठावर हल्लाबोल केला. उबाठामध्ये गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राज ठाकरेंची गरज भासतेय, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.
खासदार म्हस्के म्हणाले की, ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधनाने सुईच्या टोका इतकी देखील जागा भावंडांना देणार नाही, अशी भूमिका घेतली होती, त्याचप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज यांना शिवसेनेतून खड्यासारखे बाजुला केले होते, उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन आहेत, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी राज्यसभेत विरोध केला. वक्फ बोर्डाच्या जमिनींचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होतो. यासंदर्भात आलेल्या सुधारणा विधेयकाला तुम्ही विरोध करता, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुल्ला मौलवींकरवी मतदानाचे आवाहन करायला लावता, बाळासाहेबांना हिंदुह्रदयसम्राट म्हणायला तुम्हाला लाज वाटते, हे तुमचे हिंदुत्व आहे का, अशा जळजळीत शब्दांत खासदार म्हस्के यांनी उबाठाला जाब विचारला.
खासदार म्हस्के पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्तरोत्तर होणारी प्रगती आणि जनमानसांतील प्रतिमा उजळल्याने उबाठा आणि संजय राऊत यांच्या शरिराची लाही लाही झाली असून त्यांना आता कैलास जीवन लावावे लागेल, अशी नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. राज ठाकरे यांच्या घराला कॅफेटेरिया म्हणणे, हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय राऊत बोलू शकतात का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला. घरी पाहुणे येतात त्याला आपण हॉटेल किंवा कॅफे म्हणतो का, घराची टिंगलटवाळी करणाऱ्यांसोबत राज ठाकरे जातील का, अशी शंका खासदार म्हस्के यांनी उपस्थित केली.
खासदार म्हस्के म्हणाले की, उबाठाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती मात्र कामाचे निमित्त सांगून उबाठा, आदित्य ठाकरे फडणवीस यांना भेटतात, ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पक्षाला भेसळ म्हटले आहे. खरच भेसळ आहात की असली ते खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट करावे, असे आवाहन खासदार म्हस्के यांनी केले.