जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत एल्फी व आराध्याला अजिंक्य पदे

ठाणे : धर्मवीर क्रीडा संस्था व ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ठाणे जिल्हा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एल्फी मेकडेथी व आराध्या मोहिते यांनी अनुक्रमे १३ वर्षांखालील मुले व मुली यांच्या वयोगटात अजिंक्य पदे मिळवली.

एल्फीने अंतिम फेरीत योहान नायरचा १५/९, १५/३ असा पराभव केला, तर आराध्या मोहितेने शनाया तवाटेचा १४/१६, १५/८, १५/१३ असा पराभव केला. मात्र, ११ वर्षांखालील मुलींच्या व मुलांच्या गटात योहान नायर आणि शनाया तवाटे यांनी अनुक्रमे विहान गायकवाड व गार्गी मोहिते यांना पराभूत केले आणि सुवर्ण पदके पटकावली. १५ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात आदित्य पडवळने चंद्रांशू गुंडलेचा, तर १५ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात शनाया ठक्करने अश्विका नायरचा पराभव करून अजिंक्य पदे पटकावली.

या स्पर्धा शहीद तुकाराम ओंबाळे हॉल, कोरम मॉलजवळ येथे आयोजित केल्या गेल्या आणि त्यात जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनसोबत धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष, माजी महापौर अशोक वैती तसेच ठाणे महापालिकेच्या क्रीडा उपायुक्त श्रीमंती. मिनल पालांडे यांचा सिंहाचा वाटा होता. या स्पर्धेत सुमारे २५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला व स्पर्धा आयोजित करण्यात संदीप कांबळे व प्राजक्ता रानडे तसेच मयुर घाटणेकर व प्रमुख पंच नरेश गुंडले यांनी प्रचंड मेहनत घेतली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रख्यात उद्योजक श्रीराम भालेराव तसेच श्रीकांत वाड, राजीव गणपुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत मास्टर डबल्स ३५+मध्ये अंशू सिंघ व हनुमंत सुद्रिक विजयी विरुद्ध संतोष कदम व गौरव जोगळेकर (१५/१३, १५/१२), मास्टर डबल्स ४५+मध्ये अविनाश घोडे व उदय गायकवाड विजयी विरुद्ध अनुराग भंडारकर व क्रिष्णा पेंड्याला (१५/१२, १५/१०), मास्टर डबल्स ५५+मध्ये अजय वीज व उदय गायकवाड विजयी विरुद्ध सुरेश मिरगळ व सुभारथी मुजुमदार (१५/३, १५/४), नऊ वर्षांखालील मुलांमध्ये पर्ण वाणी विजयी विरुद्ध रितेश जंगम (१५/८, १५/११) आणि मुलींमध्ये सान्वी वागळे ही सिद्धीकशा जोशी (१५/८, १५/४) विरुद्ध विजयी झाली.