भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका स्पोर्ट्स काॅम्प्लेक्समधील तरण तलावात ग्रंथ मुथा या ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी मृतदेह पंडित डॉ. भीमसेन जोशी इस्पितळात दाखल केला आहे.
मीरा-भाईंदर महापालिका स्पोर्ट्स काॅम्प्लेक्समध्ये दोन तरण तलाव असून उन्हाळी सुट्टी निमित्ताने मुलांना पोहण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी समर कॅम्पसचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे ४० मुले रविवारी (आज) सकाळी दहा वाजता पोहण्यासाठी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील तलावात आली होती. भाईंदर पश्चिमेकडील प्लॅनेटरिया कॉम्प्लेक्स, माहेश्वरी भवन रोड, येथे राहणारा ११ वर्षीय ग्रंथ मुथा हा पोहण्यासाठी आधी तीन फूट खोल तलावात उतरला होता. काही वेळानंतर त्याने नजिकच्या नऊ फूट खोल तलावात पोहण्यासाठी उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज नसल्याने ग्रंथ बुडू लागला. तरण तलावात जीवरक्षक तैनात असतानाही त्यांचे बुडणाऱ्या ग्रंथकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रंथचा मृत्यू झाला.
याबाबत बऱ्याच उशिराने त्याच्या पालकांना कळविण्यात आल्याचे जिद्दी मराठा संघटनेचे प्रदीप जंगम यांनी सांगितले. घटनास्थळी पोहचताच प्रदीप जंगम यांनी सदर प्रकरणाची दखल घेत सदर तरणतलाव हा महापालिकेने ठेकेदाराला चालविण्यासाठी दिला असून तरणतलावात पोहणाऱ्यांवर लक्ष देण्यासाठी जीवरक्षक उपस्थित नसल्याबाबत निषेध व्यक्त केला असून जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुळेच ११ वर्षीय ग्रंथचा जीव गेल्याचा आरोप केला आहे.
नवघर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली असून मयत ग्रंथाचा मृतदेह पुढील कारवाईसाठी पंडित डॉ. भीमसेन जोशी इस्पितळात पाठविला आहे.