पेसा व बिगर पेसा क्षेत्रात शिक्षकांची पदे रिक्त
शिक्षक सेनेने केला पाठपुरावा
शहापूर : जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पेसा व बिगर पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये विज्ञान व भाषा विषय पदवीधर शिक्षक यांची शेकडो पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.
पेसा व बिगर पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये विज्ञान व भाषा विषय पदवीधर शिक्षक यांची शेकडो पदे रिक्त असून ती तत्काळ भरावी तसेच मार्च २०२५ मध्ये जाहीर झालेला जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीतील देय असलेला महागाई भत्ता फरक अदा करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश वेखंडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कल्याण तालुका अध्यक्ष महेंद्र खैरनार व शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
इयत्ता सहावी ते आठवीकरिता विषय पदवीधर शिक्षकांची पदे पेसा व बिगर पेसा क्षेत्रात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे भाषा व विज्ञान या विषय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शैक्षणिक गुणवत्तेवर देखील त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे राजेश वेखंडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. मार्च २०२५ मध्ये जाहीर झालेला जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीतील देय असलेला महागाई भत्ता फरक अदा करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश वेखंडे यांनी केली आहे.
पेसा व बिगर पेसा क्षेत्रातील भाषा व विज्ञान विषयाच्या सर्व रिक्त जागा पदवीधर वेतनोत्ती देताना बिगर पेसा म्हणजेच कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांचा नक्की विचार केला जाईल तसेच महागाई भत्ता फरक बिलाची तरतूद उपलब्ध असून महागाई भत्ता फरक बील पुढील आठवड्यात अप्राप्त शिक्षकांच्या खात्यावर जमा होईल, असे ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.