मविआचे १२ माजी नगरसेवक
उद्या शिंदे गटात प्रवेश करणार
नवी मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीला शिंदे गटाने खिंडार पाडले असून मंगळवारी होणाऱ्या निर्धार मेळाव्यात उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १० ते १२ माजी नगरसेवक शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार आल्याने प्रत्येक पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असेल तरी कुठल्याही क्षणी निकाल लागून निवडणुका लागू शकतात. त्यामुळे सर्व पक्ष कामाला लागले असून शिंदे गटाने आपले लक्ष नवी मुंबईवर केंद्रित केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका स्थापनेपासून नवी मुंबईवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. मात्र यंदा कुठल्याही परिस्थितीत नवी मुंबई महानगर पालिकेवर भगवा झेंडा फडकवायचाच असा चंग शिंदे गटाने बांधला आहे. तीन महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर व काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा पक्ष प्रवेश करवून घेतल्यानंतर शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या इतर माजी नगरसेकांवर आपले लक्ष केंद्रित केले होते. यातील १० ते १२ माजी नगरसेवकांना फोडण्यात शिंदे गटाला यश आले असून मंगळवार २२ एप्रिल रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित निर्धार मेळाव्यात जाहीर प्रवेश केला जाणार आहे.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी उपहापौर अविनाश लाड, अंकुश सोनवणे, सेनेचे सोमनाथ वासकर, कोमल वासकर, रतन मांडवे, रंगनाथ औटी, राष्ट्रवादीचे वैभव गायकवाड व दिव्या गायकवाड आदींचा समावेश आहे.