घोडबंदर रोडवरील ‘अनधिकृत’ रुग्णालय पाडणार!
ठाणे : अनधिकृत बांधकामांचे माहेरघर असलेल्या ठाणे शहरातील घोडबंदर मार्गांवरील पूर्वीचे वेदांत म्हणजे आत्ताचे टायटन नाव असलेल्या रुग्णालयाच्या तळघरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ओवळा नाका येथे वेदांत हे खाजगी रुग्णालय आहे. त्याचे सध्याचे नाव टायटन असे आहे. या रुग्णालयाला अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसून तळघराचा वापर गाड्या पार्किंग करता करणे आवश्यक असताना रुग्णालय प्रशासनाने तळ घरामध्ये ओपीडी, शस्त्रक्रिया घर आणि इतर विभागाचा कारभार सुरु केला होता. या अनधिकृत रुग्णालयाचे काही मजल्याचे बांधकाम देखिल अनधिकृत असून अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यास रुग्णच्या जीवावर बेतू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे या रुग्णालयाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात होती. परंतु महापालिका प्रशासन कोणतीच कारवाई करत नव्हते. अतिक्रमण विभाग शहर विकास विभागाकडे बोट दाखवून कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर भाजपाच्या एका बड्या नेत्याने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना फोन करताच काल १७ एप्रिल रोजी आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत रुग्णालयाच्या तळघारातील अनधिकृत बांधकामावर २६० कलमानुसार कारवाई करण्याचे आदेश माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णालयावर हातोडा पडणार असल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरु झाली आहे. अशा प्रकारे कारवाई झाली तर ठाण्यातील रुग्णालयाच्या विरोधात केलेली ही पहिलीच कारवाई ठरणार आहे.
महापालिका आयुक्त श्री. राव यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु केली आहे. मागील काही दिवसापासून कारवाईचा जोर वाढला आहे, त्यामुळे या रुग्णालयाच्या विरोधात कारवाईचे ऑपरेशन होणार असल्याने रुग्णालय प्रशासनाची धावाधाव सुरु झाली आहे.
प्रभागातील अन्य अनधिकृत बांधकामांकडे पाठ
रुग्णालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई होत असताना सर्वसामान्य ठाणेकर आणि ठाणे महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अनधिकृत इमारतींकडे मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. बाळकुम येथे अनधिकृतपणे इमारतींची बांधकामे सुरू असून कोलशेत येथे देखील चाळी आणि इमारतींची बांधकामे सुरू आहेत. याकडे सहायक आयुक्त कारवाई करण्यास का धजावत नाहीत असा प्रश्न जागरूक नागरिकांनी उपस्थित केला आहे.