डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धन राखीव दर्जा घोषित

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळमधील फ्लेमिंगोंसाठी प्रसिद्ध असलेल्या डीपीएस तलावातील पाणी अडवून तो तलाव कोरडा करण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधात पर्यावरण प्रेमींसह तत्कालीन आमदार गणेश नाईक यांनी आवाज उठवत सिडको अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले होते. मात्र आता गणेश नाईक मंत्री होताच या फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव दर्जा देण्याचा प्रस्ताव मंत्रिमडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला आहे.

एनआरआय येथील डीपीएस शाळेजवळील तलावात येणारे खाडीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगोचे तेथे येणे बंद झाले होते. याबाबत काही पक्षीमित्रांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाच्या कमिटीने घटनास्थळी भेट देत येथील जागेची पाहणी केली. नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी अशी ओळख आहे. नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर व शहरातील अनेक तलावांवर फ्लेमिंगो पक्षी विहार करत असल्याचे दृश्य नवी मुंबईकरांना रोज पाहायला मिळते. मात्र, मागील काही महिन्यांपासून एनआरआय येथील डीपीएस शाळेजवळील तलावात येणारे खाडीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगो पक्षांचे या तलावामध्ये येणाचे प्रमाण नाहीसे झाले. यामुळे पक्षी मित्रांनी थेट पालिका आयुक्तांपासून, आमदार गणेश नाईकांपर्यत तसेच उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

यावेळी तत्कालिन आमदार गणेश नाईक यांनी सिडको अधिकाऱ्यांचे वाभाडे काढत स्वतः जेसीबी घेऊन तलावात पाणी सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गणेश नाईक मंत्री होताच तलाव वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अखेर १७ एप्रिल रोजी मंत्रालय येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या २४ व्या बैठकीत महाराष्ट्राच्या वन विभागाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार नवी मुंबई ​येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सदर डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धन राखीव म्हणून घोषित झाल्यामुळे या क्षेत्रात बांधकाम करण्यास कायमस्वरूपी मज्जाव असेल. त्यामुळे सदर तलाव आता संवर्धन राखीव तलाव घोषित केल्याने नवी मुंबईतील पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.