* वाहनांच्या धुलाईसाठी रोज लाखो लिटर पाणी वाया
* ठामपाने सर्व्हिस सेंटरर्सना बजावल्या नोटीसा
ठाणे: यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणांमधील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. परिणामी वर्षभर पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या घोडबंदर परिसरासह उर्वरित ठाण्यात पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. एकीकडे पाण्यासाठी आंदोलने सुरू असताना दुसरीकडे याच ठाण्यात सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून रोज हजारो वाहनांची धुलाई करण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. या सेंटरना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी किती होईल, यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ठाणे जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत असून ठाणे शहराचे तापमान ४० अंशापर्यंत पोहचले आहे. धरणांमध्ये दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. पण सध्याच्या कडक उन्हाळ्यात या पाण्याचेही झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने पातळीत उपसापेक्षाही जास्त घट होत आहे. एकीकडे धरणांचा साठा कमी होत असताना विहिरी आणि कुपनलिकांमुळे भुजल पातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेने पत्रक काढत ठाणेकरांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले होते. वॉशिंग मशीन आणि वाहने धुताना पाणी बेताने वापरा. किंबहून वाहने धुण्याऐवजी पुसण्याचा सल्ला पालिकेने दिला होता.
ठाण्यात वाहनांची संख्या १८ लाखांवर गेली आहे. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या १३ लाखांच्या पुढे आहे. शहरात रिक्षाची गर्दीही लाखोंच्या घरात आहे तर टीएमटी आणि टुरिस्टची वाहनेही आहेत. या वाहनांची रोज धुलाई होत नसली तरी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा ती धुतली जाते. काहीजण सोसायटीच्या आवारातच आपली वाहने धुतात तर अनेकजण सर्व्हिस सेंटरचा रस्ता धरतात.
ठाण्यात वाहनांच्या धुलाईची सुविधा असलेले सुमारे ४० ते ५० सर्व्हिस सेंटर आहेत. या प्रत्येक सर्व्हिस सेंटरमध्ये दिवसाला किमान १० ते १२ गाड्या धुलाईसह सर्व्हिंसिंगसाठी येतात. सर्व्हिस सेटरमध्ये पाईपने आणि प्रेशरने वाहने धुतली जातात. पाईपने वाहन धुण्यासाठी साधारण १० ते २० लीटर तर प्रेशरने वाहन धुण्यासाठी चार लिटर किमान पाणी लागते, अशी माहिती सर्व्हिस सेंटर मालकांनी दिली. चारचाकी गाडी धुण्यासाठी साधारण १० ते २० लीटर पाणी लागते. सर्व्हिस सेंटरमध्ये प्रेशर पाईपने धुण्यासाठी किमान चार लिटर पाणी लागते. ठाण्यात अशा ४० ते ५० अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये रोज किमान १० चारचाकी वाहने धुण्यासाठी लाखो लीटर पाणी खर्च होते.
धुलाईसाठी पाणी येते कोठून
सर्व्हिस सेंटरला ठाणे महापालिका पाणी पुरवठा करत नाही. त्यामुळे बोअरवेल खोदून किंवा विहिरीच्या पाण्याने बहूतेक सर्व्हिस सेंटरवाले पाण्याची गरज भागवतात.ठाणे महापालिकेने गेल्यावर्षीही खबरदारी म्हणून सर्व्हिस सेंटरमध्ये वाहने धुण्यास मनाई केली होती. त्याला गॅरेज मालकांसह सर्व्हिस सेंटर मालकांनी चांगला प्रतिसाद दिला. ज्यांनी नियम मोडले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळीही दोन महिने सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा नियम मोडणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या पथकाचे सर्व्हिस सेंटरर्सवर लक्ष राहणार असल्याची माहिती पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी विनोद पवार यांनी दिली.