वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या तिकीटाचे दर कमी करण्याची प्रवाशांची मागणी
ठाणे: मध्य रेल्वे मार्गावर बुधवारपासून १४ अतिरिक्त वातानुकूलित रेल्वे सेवा सुरु केल्या आहेत. या रेल्वे सेवांबाबात प्रवासी संघटना आणि काही प्रवाशांमध्ये तिकीटीच्या दरांवरून नाराजी आहे.
वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या सेवा बंद असतात. जर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे तिकीट दर सरकारने ठेवले तर या रेल्वेगाड्यांचे स्वागत करु असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. उन्हाळ्यामध्ये वातानुकूलीत रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असते. मध्य रेल्वे मार्गावर दररोज १,८१० उपनगरीय सेवेच्या फेऱ्या होतात. त्यापैकी ६६ सेवा या वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या आहेत. उकाडा वाढत असल्याने बुधवारपासून आणखी १४ वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यामळे आता ८० फेऱ्या वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या झाल्या. परंतु या नव्या फेऱ्या सामाविष्ट करताना प्रशासनाने साध्या रेल्वेगाड्यांच्या ठिकाणी या वातानुकूलित रेल्वेगाड्या सुरू केल्या.
याबाबत आता प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सकाळी नेहमी रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी असते. आता साधी रेल्वेगाडी रद्द करुन त्याऐवजी वातानुकूलीत रेल्वेगाडी सुरु केल्यास या रेल्वेगाड्यांतून कितीजण प्रवास करतील हा प्रश्न आहे. अनेकदा या रेल्वेगाड्यांमध्ये वाहातनुकूलीत तिकीट किंवा मासिक पास नसलेले प्रवासी प्रवास करण्याचा प्रयत्न करतात असे एका प्रवाशाने सांगितले. तर मध्य रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी वाहतूक करतात. आता साध्या रेल्वेगाड्यांऐवजी वातानुकूलीत रेल्वेगाडी सोडल्यास वातानुकूलीत रेल्वेगाडीच्या मागे असलेल्या साध्या रेल्वे गाडीवर त्याचा भार येणार असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. तसेच वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढल्याने काही प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
वातानुकूलीत रेल्वेगाड्या सुरु करण्यास हरकत नाही. पण सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल असे दर ठेवायला पाहिजे. तसेच या रेल्वेगाड्या सुट्ट्यांच्या दिवशी धावत नाहीत. ठाणेपलीकडील प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी रेल्वेऐवजी इतर पुरेसे पर्याय नाही. त्यामुळे राज्य शासनाने देखील या प्रश्नाकडे लक्ष घालणे गरजेचे आहे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले.
वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे दर हे यापूर्वी कमी केले होते. ते धोरणात्मक निर्णय असतात. तसेच मध्य रेल्वेवर परिचालन होणाऱ्या रेल्वे वाहतुकीच्या केवळ चार टक्के वातानुकूलीत रेल्वेगाड्यांची वाहतुक होते, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले.