केंद्र सरकारविरोधात ठाण्यात काँग्रेसचे जोरदार आंदोलन

ठाणे : मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत सूडबुद्धीने ‘नॅशनल हेरॉल्ड’ या वृत्तपत्राची मालमत्ता जप्ती सुरु केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी,काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेसह इतर ज्येष्ठ नेत्यांवर चार्जशीट दाखल केल्याचा आरोप करत ठाणे काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात घोषणा देत गुरुवारी तीव्र आंदोलन छेडले.

ठाण्याच्या कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे, चंद्रकांत पाटील, संतोष केणे, दयानंद चोरघे, सचिन पोटे, रोहित साळवे, अब्दुल रशीद ताहीर मोमीन यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध सेलसह सर्व पदाधिकारी मोठ संख्येने उपस्थित होते.