ठाणे : राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला तरी त्यांची बदली करण्यात आलेली नाही. वर्षानुवर्षे ठाणे महापालिकेत ठाण मांडलेल्या या अधिकार्यांची तत्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र धाडले आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांशी आर्थिक जवळीक वाढलेल्या काही अधिकार्यांची गोची होण्याची शक्यता आहे.
शासन नियमांनुसार कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर आल्यास त्या पदावर तीन वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्याची बदली करणे बंधनकारक आहे. ठाणे महापालिकेतही अशा पद्धतीने प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आहेत. त्यापैकी मुख्य लेखापाल यांचा तीन वर्षांचा कालावधी केव्हाच संपला आहे. नगर अभियंत्यांनाही पदभार स्विकारून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. एक सहाय्य्क आयुक्त ठामपामध्ये वर्ग झाला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार नसल्याचे समजते. मात्र उर्वरित प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांची बदली होणे अपेक्षित असून त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि निर्णय प्रक्रीयेवर शंका निर्माण होत आहे,असे काँग्रेसचे पदाधिकारी राजेश जाधव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राजेश जाधव यांनी आपल्या पत्रात ते अधिकारी कोण आहेत याची नावे दिली नसली तरी त्यांचा रोख मुख्य लेखापालांकडे असल्याची चर्चा आहे. राजेश जाधव यांनी आपल्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून त्यांचे याप्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या मागणीची सकारात्मक दखल घेऊन तत्काळ योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदाच्या चार ते पाच जागा रिक्त असून शासनाकडील अधिकारी ठाण्यात यायला तयार नाहीत. महापालिका प्रशासन राज्य शासनाला अधिकारी पाठवण्याची विनंती करत आहे, परंतु कोणीही यायला तयार नाहीत. राज्य सरकारने बदली केली तर हे अधिकारी राज्य शासनाच्या सेवेत जाण्यासाठी तयार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.