बदलापूरमधून १६ एप्रिलपासून सकाळी वातानुकूलित लोकल

बदलापूर : येत्या १६ एप्रिलपासून बदलापूरहून सकाळी १०.४२ ची लोकल एसी लोकल म्हणून बदलापूर स्थानकातून रवाना होणार असून, उन्हाळ्यात बदलापूरकरांना थंडगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

मागील वर्षी प्रवासी तिकिटात जास्त खर्च पडत असल्याने, बदलापूरकरांनी एसी लोकल कडे पाठ फिरवली. ज्या लोकल सुरू झाल्या होत्या त्या मध्य रेल्वेने बंद केल्या. मात्र आता हळूहळू बदलापूरकर देखील एसी लोकलना पसंती देताना दिसत आहेत. या अनुषंगाने सकाळच्या वेळेत एक एसी लोकल असावी अशी मागणी होत असताना, मध्य रेल्वेकडून बदलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी सकाळी १० वाजून ४२ मिनिटांनी सुटणारी लोकल आता एसी लोकल धावणार आहे.

१६ एप्रिलपासून सकाळच्या वेळेतील ही लोकल एसी जलद लोकल म्हणून बदलापूर स्थानकातून १०.४२ वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी लोकल १२ वाजून १२ मिनिटांनी पोहचेल. यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत बदलापूर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर बदलापूर स्थानकातून रात्रीच्या वेळेत ११ वाजून ४ मिनिटांनी ठाणे स्थानकात जाणारी लोकल सुद्धा १६ एप्रिल पासून एसी लोकल म्हणून चालवण्यात येणार असल्याची माहिती बदलापूर रेल्वे स्थानकातून देण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर शहराच्या दळणवळणाच्या सुविधेत काय बदल करता येईल यासाठी रेल्वे प्रवाशांशी मी संवाद साधत आहे. आणि अशा वेळी ऐन उन्हाळ्यात सकाळच्या वेळेत बदलापूर स्थानकातून एक तरी एसी लोकल असावी अशी मागणी मान्य केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
बदलापूरहून सकाळी १०.४२ च्या लोकलला विरोध नाही पण, सामान्य प्रवाशांचा विचार करता, मध्य रेल्वेच्या ताफ्यात तात्काळ सहा साध्या लोकल नवीन यायला हव्यात. यामुळे निदान गर्दीच्या वेळी ठाणे आणि कल्याण वरून कर्जत कसारा लोकल वाढवता येतील. मागच्या काही वर्षात याच पट्ट्यातील लोकल प्रवासी प्रचंड वाढले आहेत याचा रेल्वे प्रशासनाने विचार करावा.असे प्रतिपादन वांगणी रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केले
रेल्वे प्रवासी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश महाजन यांनीही वातानुकूलित लोकलला विरोध नाही पण सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी साध्या लोकल वाढवण्याची मागणी केली.