शहापूर भातसा नदीत एकाच कुटुंबातील तिघे बुडाले

शहापूर : शहापूरजवळील वाफे भागात ३२ एकर भागातील भातसा नदीवर एकाच कुटुंबातील तिघेजण कपडे धुण्यासाठी व अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडलेल्या महिलांना वाचवण्यासाठी 15 वर्षीय मुलाने प्रयत्न केले असता तो ही भातसा नदीच्या पाण्यात बुडाल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांकडून माहिती मिळताच शहापूरच्या जीवरक्षक टीमच्या सदस्यांनी तत्काळ भातसा नदीकाठी पोहचून नदीतून तीनही मृतदेह बाहेर काढले.

लक्ष्मी पाटील (50), धीरज पाटील (16) दोघे ही रा. गंगारोड,
आणि वनिता शेळके (33) रा.वाफे, शहापूर अशा एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शहापूर येथील वाफे भागात येणाऱ्या बत्तीस एकर भागतील भातसा नदीवर कपडे धुण्यासाठी व अंघोळीसाठी ते गेले होते.त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडलेल्या महिलांना वाचवण्यासाठी धीरज याने प्रयत्न केले, परंतु तो ही भातसा नदीच्या पाण्यात बुडाल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तिघांचे मृत देह जीवरक्षक दल शहापूर यांनी पाण्यातून शोधून काढले असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आई, मुलगा व भाची असे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत.