जावसईत अतिक्रमणे जमीनदोस्त

अंबरनाथ : अंबरनाथला जावसई परिसरात बांधण्यात आलेल्या सुमारे २५ अतिक्रमणांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून ती भुईसपाट केली.

जावसई परिसरातून ऑर्डिनन्सकडे येणाऱ्या नाल्याच्या मार्गात अतिक्रमणे झाली होती. नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संख्ये यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पाच वाणिज्य गाळे, सात निवासी घरे आणि २५ जोत्यांवर जेसीबीच्या सहाय्याने धडक कारवाई केली. कारवाई करताना विद्युत कर्मचारी , पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाचे संख्ये यांनी सांगितले.