रेपो रेट सलग दुसऱ्यांदा कमी
नवी दिल्ली : रेपो रेटमध्ये कपात होणे म्हणजेच बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांवरील व्याजदरात घट होण्याची शक्यता वाढते. 9 एप्रिल 2025 रोजी आरबीआयने सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात जाहीर केली असून, ही बातमी गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी विशेष आनंदाची आहे. यामुळे इएमआय कमी होण्याची शक्यता असून, ग्राहकांचे हजारो रुपये बचतीत जाऊ शकतात.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 0.25% म्हणजेच 25 बेसिस पॉइंट्सनी रेपो रेट कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे आता रेपो रेट सहा टक्क्यांवर आला आहे, जो वर्षाच्या सुरुवातीला 6.5% होता. रेपो रेट हा अनेक बँकांच्या कर्ज व्याजदरांचा बाह्य निर्देशांक असतो. त्यामुळे बँकांना आता आपले व्याजदर खाली आणावे लागतील आणि ग्राहकांना स्वस्त कर्ज उपलब्ध होईल.
विशेष म्हणजे, या बदलाचा फायदा केवळ नवीन कर्ज घेणाऱ्यांनाच नव्हे, तर जुन्या ग्राहकांनाही मिळेल. जर एखाद्या व्यक्तीने फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेतले असेल, तर त्याच्या इएमआयमध्ये लक्षणीय घट होईल. याचा अर्थ, दर महिन्याला होणाऱ्या पेमेंटमध्ये बचत होईल आणि वर्षभरात ही बचत लाखोंच्या घरात जाऊ शकते.
बँकबाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या मते, ही कपात झाल्यानंतर काही ग्राहकांसाठी गृहकर्जाचे व्याजदर आठ टक्क्यांच्या खाली येऊ शकतात. मात्र याचा सर्वाधिक फायदा त्यांनाच मिळतो, ज्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला असतो. जर चांगल्या स्कोअरमुळे एखाद्या ग्राहकाला 0.10% नी कमी व्याजदर मिळाला, तर त्याने 15-20 लाखांच्या कर्जावर लाखोंची बचत होऊ शकते.
समजा, एखाद्या ग्राहकाने 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 8.5% दराने 20 वर्षांसाठी घेतले आहे, तर त्याचा इएमआय सुमारे ₹43,391 इतकी असेल. 9 एप्रिलच्या रेपो रेट कपातीनंतर हा व्याजदर 8.25% झाला, तर तोच ग्राहक आता सुमारे ₹5.24 लाखांचे व्याज वाचवू शकतो. तसेच, जर इएमआय समान ठेवला तर कर्जाची मुदत जवळपास 12 महिन्यांनी लवकर संपवता येईल.