गायमुखमध्ये कचरा पेटला; परिसर धुराने काळवंडला !

स्थानिकांच्या विरोधामुळे कचरा संकलन केंद्रामागे साडेसाती

ठाणे : दिवा, डायघरनंतर सी.पी. तलाव, मुल्ला बाग आणि आतकोली अशा सर्वच ठिकाणी कचरा संकलनाची ग्रहदशा वाईट असताना मंगळवारी रात्री गायमुख येथील कचरा संकलन केंद्राला मोठी आग लागली. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

सी. पी. तलाव संकलन केंद्राला सलग दोन वेळा आग लागल्यानंतर कचरा प्रश्न अधिक चिघळला आहे. डायघर प्रकल्प अपुरा पडत आहे. त्यात शासनाने आतकोली येथे डंपिंगसाठी दिलेल्या भूखंडाबाबत स्थानिकांचा विरोध वाढतच आहे. त्यात आता गायमुख डम्पिंगलाही आग लागल्यामुळे पालिकेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. घोडबंदर परिसरातील कचरा गोळा करून तो जुना जकात नाका येथील गायमुख संकलन भुमीवर टाकला जात आहे. ही जागा पालिकेने डम्पिंगसाठी आरक्षित केली असली तरी ती वनविभागाच्या इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येते. त्यामुळे हे डम्पिंग बेकायदा असल्याची याचिका काही महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आली होती. त्यावरून हरित लवादानेही पालिकेला फटकारले होते.

गायमुख परिसरात कचरा टाकला जाऊ नये यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पालिकेशी पत्रव्यवहार केला होता. पण सध्या कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पालिकेने गायमुख संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात डंपर रिकामी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या संकलन केंद्राचे रुपांतर डम्पिंगमध्ये होऊन येथे कचर्‍याचे डोंगर उभे राहत आहेत. जंगल परिसर असल्याने येथे ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे मिळेल त्या जागेवर कचरा टाकण्यात येत आहे. अशातच मंगळवारी रात्री सुमारे साडे आठच्या दरम्यान आग लागल्याचे निदर्शनास आले.

बाळकूम अग्निशमन केंद्राला याची माहिती मिळताच पथक एक फायर वाहन आणि रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी रवाना झाले. पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारीही पिकअप वाहनासह पोहचले. त्याआधीच वनविभागाचे कर्मचारी तेथे उपस्थित होते. डम्पिंग ग्राऊडच्या आतील भागात आग लागल्यामुळे तिथे वाहने पोहचण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले असले तरी अजूनही ती पूर्णपणे विझवण्यात अपयश आल्याचे कळते. दरम्यान यासर्व प्रकारामुळे डंपिंग परिरसारत प्रचंड धुराचे लोट पसरले आहेत.

घोडबंदर येथील गायमुख भागात संजय गांधी उद्यानाचा परिसर येतो. हा परिसर इको-सेसिटिव्ह झोन आणि बफर क्षेत्रात येतो. या भागात पालिकेकडून कचरा टाकण्यात येत असल्यामुळे सर्व नियम आणि कायदे कचरा पेटीत टाकले जात आहेत. कचर्‍यामुळे नैसर्गिक जलसंपदेला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी याआधीही केला होता. पण आता या आगीमुळे हा धोका आणखी वाढला आहे.

सी.पी. तलाव संकलन केंद्राला लागलेली आग संशयाच्या भोवर्‍यात असतानाच गायमुख येथेही तशाच पद्धतीने आग लागल्यामुळे पुन्हा एकदा संशयाचा धूर पसरला आहे. वास्तविक आपल्या भागात कचरा संकलन किंवा डम्पिंग नको असा सूर सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी लावला आहे. मात्र प्रशासनाकडे सध्या कोणताही ठोस पर्याय नसल्याने संकलन केंद्र सुरू ठेवणे अपरिहार्य आहे. त्यातूनच या आगीच्या घटना वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.