सुपर स्पेशालिटी कामगार रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात

९० टक्के काम पूर्ण

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील लाखो कामगाराना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तब्बल 102 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले सुपर स्पेशालिटी कामगार रुग्णालयाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. रुग्णालयाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

उल्हासनगर कॅम्प 3 मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या बाजूला कामगार रुग्णालय आहे. या कामगार रुग्णालयातून डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापूर येथील औद्योगिक क्षेत्र आणि लहान मोठ्या कारखान्यातील सुमारे तीन लाख कामगारांना 1971 पासून आरोग्य सेवा पुरवली जात होती. 2015 मध्ये या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आयआयटीकडून देण्यात आला. तेव्हा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मोडकळीस आलेल्या, जर्जर झालेल्या धोकादायक इमारतीच्या जागी नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे रहावे ह्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून रुग्णालयासाठी 102 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.

100 बेडच्या या रुग्णालयाकरिता 2 लाख चौरस फुटांचे दोन मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यातील अंदाजे 1 लाख पेक्षा अधिक चौरस फूट क्षेत्र हे रुग्णालयाचे आहे. यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किशन अवतार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता रणजीत बोटे, प्रकल्प व्यवस्थापक संजीव गुप्ता, कनिष्ठ अभियंता रोहित कुमार, बांधकाम व्यवस्थापक समीर पाटील यांच्या टीमने तीन वर्षात रुग्णालयाचे काम शेवटच्या टप्प्यात आणले आहे. विशेष म्हणजे इमारतीच्या बांधकामात गंजरोधक लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या तळ मजला तथा परिसरात आपत्कालीन विभाग, ओपीडी, स्वागत कक्ष, औषध दुकान, जनरेटर रूम, इलेक्ट्रिक रूम, शव विच्छेदन केंद्र, मलप्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण होत आले आहे. पहिल्या मजल्यावर सुसज्ज असे तीन ऑपरेशन थिएटर, डॉक्टर ओपीडी आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावर रुग्णांचे विविध वॉर्ड आहेत. दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचविण्यासाठी पाच लिफ्ट आहेत. ह्या लिफ्टचे काम ही शेवटच्या टप्प्यात आहे.

या कामगार रुग्णालयात विविध वॉर्ड मध्ये मिळून 115 बेड असणार आहे. 10 आयसीयू, 96 सर्वसाधारण, 6 आपत्कालीन बेड असतील. हे रुग्णालय संपूर्ण वातानुकूलित असून यंत्रणा लावण्यात आली आहे. फिजियोथेरेपी, आपत्कालीन ट्राम वॉर्ड, रेडिओलॉजी विभाग, आय.सी.यु., एन.आय.सी.यु., अल्ट्रासाऊंड आदी सुविधांनी सुसज्ज आहे.

रुग्णालयात कार्यरत पूर्णवेळ डाँक्टर व कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. टाईप 3 मध्ये 16 सदनिका ह्या विकसित करण्यात आल्या आहेत. या सदनिका वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत. तर टाईप 4 मध्ये 14 सदनिका असून त्या वर्ग 2 च्या डॉक्टर्सना आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दोन सदनिका ह्या जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.