* सहाय्यक आयुक्तांना तीन विभाग
* बीट निरीक्षक, अधिकाऱ्यांचा नाही पत्ता
ठाणे: ठाणे महापालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना अतिरिक्त दोन चार्ज देण्यात आल्याने लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील प्रलंबित कामांचा डोंगर वाढत असून नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
येथील सहायक आयुक्त श्री.घुगे यांच्याकडे उथळसर प्रभाग समिती आणि क्लस्टरचा देखील अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, त्यामुळे मूळ नियुक्ती असलेल्या लोकमान्य सावरकर प्रभाग समितीमधील प्रलंबित कामे वाढत असून त्याचा ताणही वाढत आहे. विशेष म्हणजे येथील अनधिकृत बांधकामे देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.
कर विभागातील कारकून हे बीट निरीक्षक म्हणून काम पाहतात. संबंधित वॉर्डातील अनधिकृत बांधकामे होत असल्यास त्याची माहिती रजिस्टरमध्ये घेऊन अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ लिपिकास म्हणजे बीट अधिकाऱ्यास दिली जाते. मात्र येथील महात्मा फुले, आई माता मंदिर हा परिसर असलेल्या वॉर्डात एकही बीट निरीक्षक किंवा अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढू लागला आहे.
उथळसर प्रभाग समिती आणि क्लस्टर विभागाची जबाबदारी दिल्याने श्री.घुगे यांची कार्यशक्ती विभागली गेल्याने कोणत्याही एका विभागाला न्याय देताना त्यांची दमछाक होत असल्याचे दिसत आहे, शिवाय लोकमान्य-सावरकर नगर प्रभागातील कर्मचाऱ्यांवरील अंकुशही सैल झाल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. एकूणच या प्रभागातील अनधिकृत बांधकामे फोफावत असून इतर कामेही दुर्लक्षित होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत आता आयुक्तांनीच अतिरिक्त कार्यभार देताना मर्यादा आखून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.