मराठी ग्रंथ संग्रहालयाकडून ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, श्रीकांत बोजेवार सन्मानित
ठाणे : किती विविध पद्धतीने विनोदाला स्पर्श करता येतो हे तंबी दुराईने दाखवून दिले. विनोदावर फारसे लिहिले जात नाही, त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत सचिन मोटे यांनी व्यक्त केली तर वृत्तपत्रात रोज नव्याने लिहायचे असते. त्यामुळे आज मला अग्रलेख सुचला नाही, असे म्हणता येत नाही. अशा स्थितीत मिलिंद बल्लाळ यांनी तीन दशकांहून अधिक काळ अग्रलेख लिहिताना दैनिकाला ५० वर्षांची दैदिप्यमान परंपरा मिळवून दिली, अशा शब्दांत सचिन मोटे यांनी गौरव केला.
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे संस्थेच्या वतीने रविवार ६ एप्रिलला ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ स्तंभलेखक, पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री.मोटे बोलत होते. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुस्तक भेट असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या सोहळ्यासाठी दिग्दर्शक लेखक सचिन गोस्वामी, सचिन मोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे संस्थेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर उपस्थित होते.
श्री. मोटे पुढे म्हणाले की, वृत्तपत्र चालवणं हे काय असतं हे टेलिव्हिजनमध्ये काम करणाऱ्यांना समजू शकते. आज आपण केलेले काम उद्या विसरून जायचे असते, कारण उद्या त्याची रद्दी झालेली असते. रोज नव्याने लिहायचे असते. त्यामुळे आज मला अग्रलेख सुचला नाही, असे बोलू शकत नाही. ते तुम्हाला सुचावेच लागते. अतिशय सातत्याने ते काम करावेच लागते असे ते म्हणाले.
टेलिव्हिजन माध्यमात देखील एपिसोड द्यावेच लागतात. त्याला कारणे देऊन उपयोग नाही. त्यासाठी सतत जागरूक राहावं लागतं. मी अभिनयामध्ये करिअर करायला मुंबईत आल्यावर वर्तमानपत्रांचे रोज वाचन सुरू केले. त्यावेळी माझी तंबी दुराईशी भेट झाली. ते आपल्या लेखनातून विनोदी शैलीतून राजकारणी, साहित्यिक यांच्यावर तुफान टीका करायचे ते वाचताना आनंद मिळायचा असे श्री.मोटे यांनी सांगितले. आजच्या राजकीय परिस्थितीत ठाण्यात स्तंभलेखकाचा सत्कार होतो आहे, हे विशेष असल्याचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले. वेगवेगळ्या राजकीय टप्प्यांवर तंबी दुराई यांनी केलेल्या लेखनाचे विशेष कौतुक आहे. विनोद हे सगळ्यात तीक्ष्ण हत्यार आहे. विनोदाने टीका करण्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात असे असताना तंबी दुराई या विनोदी लेखनाचे राजकीय पटलावर दखल घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे असेच लिहीत रहा असा सल्ला त्यांनी दिला. तर बल्लाळ यांचे गोस्वामी यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
जेव्हा तुमच्या वयाची साठी जवळ येते, तेव्हा असे पुरस्कार मिळतात, अशी मिश्किल कोपरखळी मिलिंद बल्लाळ यांनी सत्काराला उत्तर देताना मारली. पन्नास वर्षे वर्तमानपत्र चालू ठेवणे, खास करून कोविडनंतर प्रतिकूल परिस्थितीत देखील सातत्याने आम्ही प्रयोग करत असतो असे ते म्हणाले. या व्यवसायात मी माझ्या वडिलांची धडपड पाहिली आहे, त्यामुळे कोणताही व्यवसाय सचोटीने केला तर यश मिळतेच, असे बल्लाळ यांनी अधोरेखित केले. आजही मुद्रित शब्दांची विश्वासार्हता कमी झालेली नाही. हा पुरस्कार मिळाल्यावर अधिक प्रयोग करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल, असा आशावाद बल्लाळ यांनी व्यक्त केला. विनोदी लेखन होणे आवश्यक आहे, मात्र ते करताना मराठी संस्कृतीचे भान राखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या पुरस्काराचे मी उत्तरदायित्व निश्चितच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सातत्याने नवीन प्रयोग करीत राहिल्यामुळेच ठाणेवैभव स्पर्धेतही टिकून उभा आहे असे सांगून संपादक मिलिंद बल्लाळ यांनी वाचकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मराठी ग्रंथ संग्रहालयासारख्या शतकोत्तर संस्थेने केलेला सत्कार हा विशेष असून तो साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद आहे असे आम्ही मानतो, असे श्री.बल्लाळ यांनी म्हटले.
विनोदाचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला आहे. वडिलांना वाचन, लेखनाची आवड होती. राजकारण्यांनी माझ्या विनोदाची चूल सुरूच ठेवली. या निमित्ताने वाचक आणि राजकारण्यांच्या दोन पिढ्या मी पाहिल्या. माझ्या लेखनामुळे आतापर्यंत राजकारणी रागवले नाहीत पण काही साहित्यिक रागावल्याचे स्तंभलेखक, पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी सांगितले. लेखनाचे स्वातंत्र्य घेताना कोणाला आपण किती ओरखडे काढायचे याचे तारतम्य ठेवले पाहिजे. आजवर अनेक राजकीय नेत्यांनी माझ्या लेखनावर दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या. तंबीदुराईमुळे मला राजकारण्यांची दुसरी बाजू बघायला मिळाली, असे बोजेवार यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यवाह दुर्गेश आकेरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निर्मोही फडके यांनी केले. या कार्यक्रमाला ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.