सीएसआर फंडातून मिळाले सव्वा दोन कोटी
ठाणे: क्षयरोग निर्मुलनासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ठाणे महापालिकेला मोठमोठ्या कंपन्यांनी सव्वा दोन कोटींचा सीएसआर फंड देऊन त्यांच्या कामाला आर्थिक हातभार लावला आहे. क्षयरोग निर्मूलन मोहिमेत चांगले काम करणारी ठाणे महापालिका राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे, ठाणे शहर 100 टक्के क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या डॉक्टर, अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले जात आहे.
राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आज कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केले होते. क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाचे सर्व डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून आत्मीयतेने काम करीत आहेत. महापालिका दफ्तरी नोंद असलेल्या क्षयरुग्णांच्या घरी भेटी देऊन संबंधित रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शन करीत आहेत. या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे क्षयरोगाबाबत राज्यशासनाकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात विविध महानगरपालिका आणि जिल्हयांतील क्षयरोग विभागांमध्ये ठाणे महापालिकेने चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळत असते, पण हे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त 15 हजार मानधन देणारी ठाणे ही देशातील एकमेव महापालिका असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागास सीएसआर निधीतून एक कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल महानगर गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष आत्मकुर चक्रपाणी व सीएसआरचे मुख्याधिकारी सुशांत राऊत तसेच मिंट कॉर्पोरेशनने सीएसआर निधीतून सव्वा कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल उपमहाव्यवस्थापक इंदरदीप कौर यांचेही खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले.
यावेळी क्षयरोग निर्मूलनाची मोहिम प्रभावीपणे राबविणारे क्षयरोगतज्ज्ञ व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर क्षयरोग विभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निखिल लिंगायत, अशोक बोरोले, संजय पवार, साधना जाधव, स्वप्नाली भालेराव आदींना प्रातिनिधीक स्वरुपात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत ठाणे शहर 100 टक्के क्षयमुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल, क्षयरोगतज्ज्ञ व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.