बुद्धिबळात पंचमने मिळवले आंतरराष्ट्रीय मानांकन

कसारा: येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये वास्तव्यास असलेला 13 वर्षीय पंचम पंडित हा इयत्ता सातवीचा विद्यार्थी असून त्याने बुद्धिबळमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविले आहे.

मागच्या वर्षी त्याने नाशिक जिल्ह्यातही बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवले होते. गेल्या वर्षभरापासून ग्लोबल चेस अकॅडमी कसारा येथे तो बुद्धिबळ प्रशिक्षण घेत आहे. पंचमला बुद्धिबळमध्ये ‘रॅपिड’ प्रकारामध्ये हे मानांकन मिळाले आहे. इतक्या कमी वयात बुद्धिबळ क्रीडा प्रकारात मानांकन मिळाल्याने पंचमच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्लोबल चेस अकॅडमीचे विनोद साळवे यांच्या मार्गदर्शनामुळे पंचमला हे यश मिळवता आले, असे पंचमच्या वडिलांनी सांगितले.