पडघा: ठाणे शहराची कचराकोंडी सोडवण्यासाठी ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या आतकोली या गावाच्या हद्दीत शासनाने दिलेल्या डंपिंग ग्राऊंडवर टाकायला सुरवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून या डंपिंग विरोधात सर्वपक्षीय नागरिक ७ एप्रिल रोजी उग्र निदर्शने करणार असल्याची माहिती स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समितीचे निमंत्रक रमेश शेलार यांनी बुधवारी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या शीळ डायघर परिसरातील डम्पिंग ग्राउंडची साठवणूक क्षमता संपली असतानाच तेथील कचरा अनेक वेळा पेटवून दिला जात होता. मागील महिन्यात ठाणे शहरात अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले असतानाच त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने भिवंडी तालुक्यातील मौजे आतकोली येथील सर्वे नंबर ४,५,१३ व १४ मधील एकूण ३४.७२ (हेक्टर आर) जागा ही ठाणे महानगरपालिकेस स्थानिकांच्या भावनांचा कोणताही विचार न करता दिली गेली. या जागेवर ठाणे पालिकेकडून सध्या दररोज १०० हून अधिक गाड्यांमधून हजारो टन कचरा टाकला जात असल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे आतकोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा श्वास कोंडला जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या भावना तीव्र असून त्या विरोधात सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने हे आंदोलन केले जाणार असल्याची भूमिका प्रकाश भोईर यांनी बोलून दाखवली आहे.
आतकोली हे गाव भादाणे ग्रामपंचायत हद्दीत असून या गावाची लोकसंख्या चार हजार असून या पंचक्रोशीत जू पाडा, चिंबी पाडा, शेरेकर पाडा, आन्हे, वांद्रे, सोर, पिसे, चिराड पाडा, किरवली, आमणे, वाशेरे, सापे, अर्जुनली, तळवली, पडघा, कुरुंद, वाफाळे, दळेपाडा अशी गावे असून येथील लोकसंख्येचा विचार केल्यास एक लाखावर जाईल.
या भागात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे गोदाम असल्याने गोदाम हब म्हणून ओळखला जाणारा परिसर असल्याने नोकरीनिमित्त लाखो नागरिक या भागात येत असतात. अशा सर्वांच्या आरोग्याशी शासन खेळत असल्याचा आरोप प्रकाश भोईर यांनी केला आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग व मुंबई वडोदरा महामार्ग याच भागातून जात आहे. तालुक्यातील या भागातील ३२ गावांच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याच भागात मुंबई क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारत आहे. या डम्पिंग ग्राउंडच्या काही अंतरावरच ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालय बनवण्यात येत आहे. तर एक किलोमीटर अंतर परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणारे पिसे धरण आहे. ही जागा ठाणे महापालिकेस देताना स्थानिक ग्रामपंचायतीकडून ना हरकती घेण्याची सुद्धा गरज शासनाला वाटली नाही का असा सवाल समितीचे विधी सल्लागार ॲड. संदीप जाधव यांनी उपस्थित केला आहे. हे डम्पिंग ग्राउंड राजकीय दबावातून येथे सुरू केले असून त्यासाठी कोणत्याही अटीशर्थी पाळल्या गेलेल्या नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडूनही योग्य ती परवानगी ठाणे पालिकेने घेतली नसतानाच हे डम्पिंग ग्राउंड सुरू केले असल्याची तक्रार करीत या प्रकरणी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून हा लढा अधिक तीव्र केला जाणार असल्याची प्रतिक्रिया ॲड. जाधव यांनी दिली आहे.