बदलापूरमध्ये नागरिकांमध्ये खळबळ
अंबरनाथ: सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी दुपारी फुटल्याने वाहिनीमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाण्याचे मोठे फवारे उडाले. यामुळे बदलापूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
बदलापूर एमआयडीसी भागातील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी आज शुक्रवार (4) एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास फुटली. फुटलेल्या वाहिनीतून शेकडो लिटर सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले तसेच पाण्याचे फवारे उंचच उंच उडू लागले. पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना तसेच जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना त्याचा त्रास सोसावा लागला.
जुनी झालेली वाहिनी बदलून त्याजागी जादा क्षमतेची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. अज्ञात वाहनाची धडक लागल्याची शक्यता एमआयडीसी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तासाभरात नादुरुस्त वाहिनी दुरुस्त करण्यात आल्याची माहिती एमआयडीसीतर्फे देण्यात आली. अनेकदा वाहिनी फुटत असल्याने त्याचा त्रास सोसावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.