गंगा आरती दरम्यान मंत्री प्रताप सरनाईकांकडून सन्मानित
ठाणे : मासुंदा तलावाच्या घाटावर झालेल्या गंगा आरती सोहळ्यादरम्यान १० वर्षे वयाच्या अर्जुनी सस्ते या विद्यार्थिनीने शेकडो भाविकांसमोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित आवेशपूर्ण भाषण करीत साऱ्यांची मने जिंकली.
हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला गंगा आरतीच्या धर्तीवर ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट आणि उपवन तलाव येथे गंगाआरती करण्यात आली. खास हरिद्वारहून आलेले पुरोहित ही आरती करणार असल्यामुळे पूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. अशा भक्तीपूर्ण वातावरणात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त आवेशपूर्ण संवाद साधत १० वर्षीय अर्जुनी सस्तेने या आरती सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेले.
अंबर इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या अर्जुनीच्या या कार्यक्रमाची दखल सर्वांनीच घेतली. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे विश्वस्त अरविंद जोशी यांच्यातर्फे अर्जुनीला सन्मानचिन्ह देण्यात आले तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथील गंगाआरती संपल्यावर अर्जुनीचा छोटेखानी गौरव करत तिच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.