नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या हापूस आंब्याच्या आवकमध्ये वाढ होत असल्याने दरात घसरण पहावयास मिळत आहे.
गुरुवारी बाजारात देवगगड, रायगड आणि कर्नाटक येथून ७५,९८४ पेटी आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेट्या कोकणातील हापूसच्या आहेत. मात्र बाजारात सध्या ग्राहक नसल्याने हवा तसा हापूसला उठाव नाही, त्यामुळे दरातही घसरण झाली आहे. मागील आठवड्यात ४-६ डझनाला दोन हजार ते पाच हजार रुपये दर होता. परंतु आता एक हजार ते चार हजारपर्यंत दर आहेत.
यंदा बाजारात देवगड हापूसच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली. यंदा उत्पादन चांगले असेल असा अंदाज आहे. परंतु मध्यंतरी झालेला हवामान बदल, पावसाने उत्पादनाला फटका बसल्याने हंगामाला उशीराने सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्यानंतर बाजारात हापूसची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यापासून बाजारात ५० हजाराहून अधिक पेट्या दाखल होत आहेत.
आज गुरुवारी बाजारात हापूस आंब्याच्या एकूण ७५,९८४ पेट्या दाखल झाल्या असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ६३,३०४ पेट्या तर कर्नाटक येथून १२,६८० पेट्या दाखल झाल्या आहेत. परंतु सध्या बाजारात ग्राहक नसल्याने हापूसला मागणी कमी आहे. मागील आठवड्यात प्रति पेटी दोन ते पाच हजार रुपयांना उपलब्ध होती, परंतु आता आवकही वाढली असून मालाला उठाव कमी असल्याने दर उतरले आहेत. मागील आठवड्यात दोन ते सहा हजार रुपयांवर विक्री होणारी पेटी आता एक हजार ते चार हजार रुपयांनी विक्री होत आहे.