मिलिंद बल्लाळ व श्रीकांत बोजेवार यांचा जाहीर सत्कार

ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेतर्फे ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि श्रीकांत बोजेवार यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

ठाण्यातील अग्रणी स्थानिक दैनिक ‘ठाणेवैभव’ या वर्तमानपत्राला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांचा तसेच गेली २५ वर्षे वर्तमानपत्रातून ‘तंबी दुराई’ या नावे स्तंभ लेखनातून वाचकांना आनंद देणारे पत्रकार व माजी संपादक श्रीकांत बोजेवार या दोघांचाही जाहीर सत्कार होणार आहे.

दूरचित्रवाणीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक व लेखक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे हे दोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथील वा. अ.रेगे सभागृहात होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे.