रेडी रेकनर दरवाढ : सरकारने फेरविचार करावा-सचिन मिराणी

ठाणे : ‘रेडी रेकनरच्या दरातील वाढीचा बांधकाम व्यवसायावर विपरीत परिणाम तर होणार आहेच, परंतु सर्वांसाठी परवडणारी घरे देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमास खीळ बसणार आहे’, असे परखड मत महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज (एमसीएचआय) क्रेडाई ठाणे शाखेचे नियोजित अध्यक्ष सचिन मिराणी यांनी व्यक्त केले.

‘ठाणेवैभव’शी बोलताना श्री. मिराणी यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल काळजी व्यक्त केली. जमिनीच्या वाढीव किमती आणि घरांच्या किमतीवर झालेला त्याचा परिणाम अशा दुहेरी संकटात रेडी रेकनर दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर घरखरेदी जाणार आहे.

रेडी रेकनरच्या वाढीव दराचा अनेक पातळ्यांवर परिणाम होणार आहे, असे सांगून श्री.मिराणी म्हणाले की यामुळे स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीच्या खर्चात वाढ होणार आहे. विकास शुल्कातील वाढ, कामगारांच्या वाढत्या अपेक्षा आदींमुळे घरांच्या किमती आधीच वाढल्या आहेत आणि त्यामुळे गृहखरेदीचा वेग मंदावू शकतो.

श्री.मिराणी हे ४ एप्रिल रोजी मावळते अध्यक्ष जितुभाई मेहता यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. नूतन अध्यक्षांना रेडी रेकनरचा विषय तातडीने हाती घ्यावा लागणार आहे. ‘आम्ही सरकारला आमचे म्हणणे सांगून न्याय देण्याची मागणी करू’, असे श्री.मिराणी म्हणाले.