केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान
ठाणे : पोस्टर लावण्यासाठी मी कधी एक रुपयाही खर्च केला नाही, आणि यापुढे करणारही नाही मात्र हल्ली कोणतेही पद मिळाले की कार्यकर्ता ‘साला मैं तो साब बन गया’ अशा तोऱ्यात मिरवतो, होर्डिंग-बॅनरबाजी करतो, अशी टीका करत केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा अमृत गौरव सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी श्री.गडकरी बोलत होते.
आपल्या भाषणात श्री.गडकरी जुन्या आठवणींना उजाळा देत गाडगीळ यांचे भरभरून कौतुक केले. गडकरी पुढे म्हणाले की, १९९५ साली महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी अनेक कार्यक्रम व्हायचे आणि त्या जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान गाडगीळ यांना मिळाला. एखादी मुलाखत घेताना मुलाखत देणाऱ्याला मनमोकळेपणाने बोलते कसे करावे हे त्यांचे कौशल्य आहे.
हल्ली टीव्हीवर किंवा आता वर्तमानपत्रामध्ये अनेक वेळा मुलाखती होतात. मात्र त्या मुलाखतींमध्ये गुन्हे वकिलासारखे प्रश्न विचारून समोरच्याला कमी लेखत त्याच्यातील एखाद्या उणीवेवर बोट ठेवले जाते, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मात्र गाडगीळ यांनी चार हजारहून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी कोणाला दुखावल्याचे किंवा कमी लेखल्याचे एकही उदाहरण नाही. म्हणजे रक्ताचा एक थेंबही न सांडवता शस्त्रक्रिया करण्याचे कसब गाडगीळ यांच्या आहे, असे गौरवोद्गारही श्री.गडकरी यांनी काढले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नाना मारणे, प्रसाद लिमये व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान ठाणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा नवरात्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच, जगन मित्र सुधीर गाडगीळ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.