* राष्ट्रीय लोकअदालतीत १०१११५ प्रकरणे निकाली
* दोन अब्ज ३५ कोटी रकमेची तडजोड
ठाणे : राष्ट्रीय लोक अदालतीत आपसात तडजोड करून दावे निकाली काढण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. शनिवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण एक लाख १११५ प्रकरणे निकाली निघून दोन अब्ज ३५ कोटी ६८ लाख १६,२३१ एवढ्या रकमेची तडजोड झाली आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमधील लोकांचा वाढता सहभाग पाहता लवकरच विविध न्यायालयांमधील प्रलंबित दाव्यांची संख्या झपाट्याने कमी होईल, असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी व्यक्त केला.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्ह्यासह तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये या वर्षाची पहिली राष्ट्रीय लोक अदालत शानोवारी (ता. 22) रोजी पार पडली. जिल्हा न्यायालय व अधिनस्त तालुका न्यायालयांची मिळून १०५ पॅनल्सद्वारे लोकअदालतमध्ये एकूण ३३,३७४ प्रलंबित प्रकरणे व ६७,८८१ दावा दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून न्यायालयीन वाद कायमस्वरूपी व जलद निकाली काढला जातो. त्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत व मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे.
ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण ३७५ प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात आल्याने त्यातील कुटुंबियांना व वारसांना त्वरीत नुकसान भरपाई मिळाली आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.
या अदालतमध्ये अत्यंत जुनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली पाच वर्षे, १० वर्षे, २० वर्षे आणि ३० वर्षे जुनी असलेली एकूण १४०० प्रकरणे निकाली काढण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण ३७५ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येऊन एकूण ३८ कोटी २८ लाख २२,९०९ रूपयांची तडजोड, तसेच 70 लाखांपेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या दोन प्रकरणांचा समावेश होता.
कौटुंबिक न्यायालयातील वैवाहीक प्रकरणांमधील वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी व कौटुंबिक संबंध पुनःप्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यामध्ये वैवाहीक वादाच्या एकूण ८३ प्रकरणांमध्ये यशस्वी समेट घडला, पैकी १६ प्रकरणांत पती-पत्नी एकत्र नांदावयास गेले.
धनादेश प्रकरणांतील जुनी प्रलंबित ९१९ प्रकरणे निकाली निघून त्यात २० कोटी, २८ लाख ९३५ रुपये रक्कमेची तडजोड झाली.
किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असुन जवळपास २६,३८० आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबुल करून दंडाची रक्कम एक कोटी ६९ लाख ३९,९०० रुपये जमा केली.
प्रॉपर्टी टॅक्स/रेव्हेन्युची दाखलपूर्व ५०,०२७ प्रकरणे निकाली निघाली. त्यामधून ९० कोटी २१ लाख २०,६०४ रुपये तडजोडीतून जमा झाले.