औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात हवीच कशाला? – एकनाथ शिंदे

ठाणे: क्रूर औरंगजेबाने महाराष्ट्रावर चाल करत असंख्य देवळे नष्ट केली, माता-भगिनींचा अपमान केला. छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ करून त्यांची हत्या केली. अशा औरंग्याची कबर, निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही शिवभक्तांची भावना आहे, तिच माझीही भावना आहे, असे परखड मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

ठाण्यातील कोपरी येथे एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तेथे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करता कामा नये. तो देशद्रोही, क्रूरकर्मा होता. त्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा म्हणजे आपल्या दैवताचा छळ केला. अशा औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. काँग्रेसमध्ये औरंगजेबी वृत्ती दिसते असे म्हणत त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास वाचावा. किमान छावा चित्रपट पहावा आणि नंतर उदात्तीकरणाचा विचार करावा असे एकनाथ शिंदे म्हणाले.

तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली पाहिजे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता ठाणे जिल्ह्यात छत्रपतींचे पहिले मंदिर उभे राहत असून ते भुषणावह आहे. त्यामुळे तिथीप्रमाणे धडाक्यात शिवजयंती साजरी होणार असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान जगतगुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार हा आपल्यासाठी सर्वात मोठा असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा पुरस्कार वारकरी, धारकरी, शेतकरी आणि लाडक्या बहिणींना समर्पित केला.