धुळवडीत मद्यपींची झिंग उतरवली

ठाणे : होळी आणि धुळवडीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ९१ वाहन चालकांसह ७७८ जणांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करून त्यांची झिंग उतरवली.

पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल होळीच्या सणाच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणारे ९१ वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून पुढील कारवाईकरिता न्यायालयात पाठवण्यात आले आहे. तर ४१३ विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांच्या आणि ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या २७४ अशा एकूण ७७८जणांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्या विरोधातील आरोपपत्र न्यायालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.

ठाणे वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला देखिल अशाच प्रकारे कारवाई करून अनेक मद्यपींच्या विरोधात कारवाई केली होती. पोलिसांच्या नाकाबंदीमुळे कुठेही मोठ्या अपघाताची नोंद ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.