ठाणे महापालिकेत तीन हजार कोटींचा हिशोबच लागत नाही?

* पाच वर्षांत ऑडिट झाले नसल्याचा आरोप
* आमदार संजय केळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

ठाणे: ठाणे महापालिकेचे मागिल पाच वर्षांत ऑडिट झाले नसल्याचे समोर आले असून सुमारे तीन हजार सात कोटी रुपयांचा हिशोबच लागत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी महापालिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची लेखी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच महापालिकेचा ५,६८५ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये महापालिकेचे महसूली उत्पन्न कमी झाल्याचे स्पष्ट झाले असतानाच महापालिकेचे मागिल पाच वर्षाचे लेखा परीक्षणच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे तर तब्बल तीन हजार सात कोटी रुपयांचा हिशोब लागत नसल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात महापालिकेने खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ लागत नाही तर राज्य सरकारकडून आलेल्या विशेष निधीचा पत्ताच लागत नसल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेत अनेक कामात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप ठाणे शहराचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष समिती नियुक्त करून सर्व नागरी सुविधांच्या कामाची सखोल चौकशी करावी, अशी लेखी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ठाणेवैभवने मागिल आठवड्यात झालेल्या रस्त्याच्या पुन्हा निविदा काढल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची देखिल दखल श्री. केळकर यांनी घेतली आहे. कोरोना काळात महापालिकेच्या तीनशे कोटींच्या ठेवी मोडण्यात आल्या होत्या तर डबघाईला आलेल्या ठाणे परिवहन सेवेची दहा कोटींची ठेव देखिल ठेकेदाराचे बिल देण्यासाठी तोडण्यात आली होती. महापालिकेने मागिल पाच वर्षांत निधी कुठे आणि कसा खर्च केला याचे लेखा परीक्षण झाले नाही, त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि सन २०२०-२१ या वर्षाचे ऑडिट झाले असून त्याला स्थायी समितीची मान्यता अजूनही मिळाली नाही तर सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण करण्याचे काम सुरु असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी देखिल महापालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लेखा परीक्षणाचा हिशोब द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे तर खासदार नरेश म्हस्के यांनी लेखा परीक्षण होणार असून विरोधकांना त्याचा हिशोब मिळेल असे सांगितले. विरोधक आरोप करण्याशिवाय काहीच करत नसल्याची टीकाही श्री. म्हस्के यांनी केली.