दगड-माती भरणीला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद?
शहापूर : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पशु-पक्षांची, शेतकऱ्यांच्या पशुधनाची, जंगलातील वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी पंचायत समिती आणि जलसंधारण विभागाअंतर्गत केटी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामाने ते पोखरून गेलेले आहेत. काही बंधारे अंदाज पत्रकानुसार न बांधता त्या बंधा-यांमध्ये अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने दगड मातीचा भरणा करुन दोन्ही बाजूने काँक्रीट मालाचा मुलामा देऊन सजविले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संबंधित कामांची निष्पक्ष चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे केली आहे. सन 2020 ते 2024 पर्यंत जलसंधारणमधून 33 बंधारे आणि पंचायत समिती लघु पाटबंधारेमधून 19 म्हणजे तालुक्यात 52 बंधारे बांधले आहेत. मात्र शासनाने करोडो रुपये खर्च करून देखील बहुतांश बंधा-यांमध्ये घोटभर पाणी नाही.दरम्यान प्रस्तावित जागा सोडून दुसऱ्याच ठिकाणी बंधारे बांधल्याचे उघड असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. काही बंधारे हे नदी-नाल्याना 100 ते 200 मीटर अंतरावर बांधले आहेत. यामध्ये तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींचा समावेश असून ढाढरे, साकुर्ली, टेम्भूर्ली, शिलोत्तर, चोंढे, कोथले, कळभोंडे, तलवाडा, कसारा, खराडे, गुंडे, हिंगलूद, बेलवली, रिकामवाडी, डोंगरवाडी, शाई नदी व चोर नदी आदी ठिकाणी बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. काही कामे सुरु आहेत. तसेच या कामांचा दर्जा,अंतर, प्रस्तावित ठिकाण तसेच जलस्रोताचे ठिकाण तपासून तसेच फोटो पंचनामे करून जलसंधारण विभाग अंतर्गत सुरु असलेली आणि पूर्ण झालेल्या कामांची समक्ष भेट देऊन चौकशी करून कामे तत्काळ बंद करावीत. तसेच संपूर्ण कामांची चौकशी झाल्याशिवाय कोणत्याही कामांची बिले अदा करू नयेत. संबंधित सर्व अधिकारी वर्गाची खातेनिहाय चौकशी करावी आणि दोषींवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी तक्रार वजा मागणी भूषण साबळे यांनी केली आहे.
जलसंधारणमधून आणि पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या बंधा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यामध्ये संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचा हात आहे. याची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने उपोषणचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा तक्रारदार भूषण साबळे यांनी दिला आहे.
शहापूर तालुक्यात जलसंधारणमधून 33 बंधारे आणि पंचायत समिती लघु पाटबंधारेमधून 19 म्हणजे तालुक्यात 52 बंधारे बांधले आहेत.मात्र सर्व कामे बोगस असून त्यांच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी सदर बांधकामे तोडण्यात यावीत. किंबहुना यासाठी जी काही डिपॉझिट रक्कम शासनाकडे भरणा करावयाची असेल ती रक्कम मी भरण्यास तयार असल्याचे भूषण साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.